शेतकरी कन्यांच्या उपोषणावर पोलिसांची कारवाई, पुणतांब्यात ग्रामस्थांनी पुकारला बंद
पुणतांब्यात कृषीकन्या गेल्या सहा दिवसांपासून शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसल्या आहेत. अन्नत्याग करून अंदोलन करणा-या या मुलींची शुक्रवारी तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना अहमदनगर शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे.
मुलींची तब्येत बिघडल्याने पोलिसांनी जबरदस्तीने मुलींच्या या अंदोलनावर ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईला अंदोलक मुलींनी आणि नागरिकांनी विरोध केला. अंदोलक निकीता जाधव, पूनम जाधव यांना बळजबरीने रुग्णालयात हलवण्याता आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुणतांबे मधील उपोषणस्थळावरचा मंडपही काढण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या दडपशाही विरोधात ग्रामस्थांनी आज पुणतांब्यात बंद पाळला आहे.
अंदोलक धनंजय जाधव यांच्यासह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणतांब्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
शेतीमालाला हमीभाव, दुधाला 50 रुपये प्रती लिटर भाव, शेतक-यांना कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी पुणतांब्यात शेतकरी कन्यांचे उपोषण सुरु आहे. पुणतांबा येथून ‘देता की जाता’ असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर यात्रा सुरु आहे.