पुणे महापानगरपालिका कर्मचाऱ्यांची आता उतरवणार ‘नशा’ !

व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजा, व्यसनमुक्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

0

पुणे : पुणे महानगरपालिकेने व्यसनाच्या जोखडात अडकून पडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी आता  पुढाकार घेतला. व्यसनाचा विळखा सोडवण्यासाठी धडपडत असलेले आपले कर्मचारी आणि सेवकांना व्यसनमुक्ती केंद्रात येणारा खर्च महापालिकेकडून उचलला जाणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य योजनेद्वारे हा खर्च केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. विशेष बाब म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजाही दिली जाणार आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला जाणार असल्याची माहितीही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

महिला व बालकल्याण विभागाचा पुढाकार

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि महिला व बालकल्याण समिती यांच्या सहकार्यातून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी व्यसनमुक्ती आणि मन:स्वास्थ्य केंद्राचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष माधुरी सहस्त्रबुद्धे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपायुक्त अजित देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

एका महापालिका कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात 10 दिवस उपचार घेतले. त्यासाठी त्याला जवळपास 10 हजार रुपये खर्च आला. तो खर्च पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळावा, अशी मागणी करण्यात आली. यापूर्वी महापालिकेकडून अशाप्रकारचा खर्च देण्याचा कुठलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. मात्र, आता महिला व बालकल्याण समितीने पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात येणारा खर्च आणि उपचारांसाठी रजा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश 

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून पालिका कर्मचाऱ्यांना व्यसमुक्ती शिबिरात दाखल होण्यासाठी पगारी रजा देणे, त्यांना लागणाऱ्या खर्चाचा भार पालिकेने उचलणे, अशा महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. तसेच पुढील 3 महिन्यांत 6 कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले. पालिकेचे कर्मचारी व्यसनमुक्त होणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.