बिहारमध्ये उद्या जाहीर सभांनी रणधुमाळीला सुरुवात
बिहार विधानसभेच्या रणांगणात उद्या पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आमने-सामने
नवी दिल्ली : बिहार विधानसभेच्या रणांगणात उद्या पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आमने-सामने असणार आहेत. दोन्ही नेते आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात उद्या एकाच दिवशी करत आहेत. पंतप्रधान मोदी उद्या सकाळी 11 वाजता बिहारमधील सासाराम येथे प्रचार सभेला संबोधित करतील. कोरोना काळात त्यांची ही पहिली जाहीर सभा असेल. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची एकत्रित सभा ही उद्याच होणार आहे.
भाजपने आजच आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक बिहारवासियांना मोफत कोरोना लसीची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता उद्याच्या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे लक्ष असेल. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या स्वतंत्र लढण्यावरून खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यांना आतून भाजपचा पाठिंबा आहे का, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्याही बाबतीत मोदी पक्षाची भूमिका स्पष्ट करणार का? नितिशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हे पुन्हा ठणकावून सांगणार का हे पाहावे लागेल. बिहारमध्ये 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे तर तीन आणि आणि सात नोव्हेंबर असे एकूण तीन टप्पे आहेत. 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारच्या या निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दाही चर्चेत आहे. तेजस्वी यादव यांनी दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिल्यानंतर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात 19 लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिलेले आहे. पंतप्रधान मोदी बिहारच्या रणधुमाळीत एकूण बारा जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. उद्या राहुल विरुद्ध मोदी या लढाईने या रणधुमाळीची सुरुवात कशी होते हे पाहणं औत्सुक्याचे असेल. अमित शाहांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात कुजबुजीने चर्चिला जाणारा विषय. पण याबाबतच्या सगळ्या शंका कुशंकांना मागे टाकत अमित शाह भाजपच्या मिशन बिहारसाठी स्वत: मैदानात उतरणार आहेत. बिहारमध्ये 243 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. त्यासाठी अमित शाह यांच्या किमान 12 रॅली होणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे. यातल्या काही रॅली व्हर्चअुल असतील, पण किमान 9 रॅली ते प्रत्यक्षपणे संबोधित करतील, असे सांगितले जाते.