औरंगाबाद : वाळूज महानगर – सिडको वाळुज महानगर 1 येथील सिडकोच्या उद्यानाची परिसरातील पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळेतील विद्यार्थी सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत येऊन स्वच्छता करत आहेत. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी येथील गार्डनची या मंडळींकडून स्वच्छता होत असल्याने लवकरच या गार्डनचे रुप पालटणार आहे. मात्र सिडको प्रशासन संबंधित विभागाकडून या गार्डनची काळजी घेणे गरजेचे असताना हे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांतून चर्चा आहे.
वाळूज महानगर परिसरातील काही भागांत सिडको प्रशासनाकडून उद्यानेन उभारली आहेत. अनेक दिवसांपासून या उद्यानांकडे सिडकोकडून दुर्लक्ष होत असल्याने यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अनेक उद्यानामधील फुटपाथ, लावण्यात आलेल्या कारंजे याची दुरवस्था झाली असून उद्यानामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सिडको प्रशासन संबंधित विभागाला याबाबत नागरिकांकडून वेळोवेळी माहिती दिल्याचे वृक्षारोपण वृक्षसंवर्धन फाउंडेशनचे पोपट रसाळ व नागेश कुठारे यांनी सांगितले. मात्र हे प्रशासन काहीही हालचाल करत नसल्याने सिडको येथील मोठ्या उद्यानाची मागील एक महिन्यापासून लोकसहभागातून स्वच्छता केली जात आहे. पुढील दोन महिने हा उपक्रम चालणार असून उद्यानामध्ये चांगली पर्यावरणपूरक झाडे लावण्यात येणार आहेत. याठिकाणी काही वड, पिंपळ, जांभूळ, असे विविध रोपे लावण्यात आली आहेत. लोकसहभागातून लोकवर्गणीतून श्रमदानातून या ठिकाणी मुलांसाठी खेळणी, व्यायामाचे साहित्य लावणार आहे. त्यामुळे या उद्यानाचे रुप लवकरच पलटणार आहे. या स्वच्छता मोहिमेत वृक्षरोपण वृक्षसंवर्धन फाउंडेशन सह्याद्री वृक्ष बँक आणि समस्त सिडको वाळुज महानगर एक परिसरातील पोपट रसाळ , नागेश कुठारे, कृष्णा गुंड, भगवान अवसरमल, उमेश तांबट, गणेश बिरादार, डॉ. गजानन काळे, काकासाहेब बुट्टे, ललिता डांगे, संगीता तांबे, देवदत्त कोकाटे, रोहित चिकणे, तरटे संदीप, गजानन काळे, गणेश भोसले, किसन ठाकरे, नारायण सोनवणे, राजेश पाटील आदींचा सहभाग आहे.
सहाय्यक मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे म्हणतात….
सहाय्यक मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, माझ्या विभागाला नागरिकांकडून निवेदन दिलेले नाही. माझ्या विभागाकडून कचरा उचलण्यासाठी कर्मचारी व ट्रॅक्टर नेहमी पाठवतो
. माझ्या विभागाकडून नागरिकांकडून स्वच्छता करून गोळा केलेला कचरा उचलण्यात येत आहे. यासाठी कर्मचारी ट्रॅक्टर च्या साहायाने येथील कचरा उचलत आहे.
सिडकोचे मुख्य प्रशासक यांना अनेकदा दिली निवेदने
सिडकोचे मुख्य प्रशासक यांना अनेकदा निवेदने देऊन उद्यानाची सुधारणा झालेली नाही. त्यामुळे लोकसहभागातून मागील महिन्यापासून प्रत्येक रविवारी परिसरातील आम्ही नागरिक सिडको वाळुज महानगर 1येथील गार्डनची स्वच्छता करत असल्याचे तीसगावचे उपसरपंच व शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे यांनी सांगितले आहे.