नांदेडमध्ये लोकशाहीची क्रूरचेष्टा, सरपंच आणि उपसरपंचपदाचा जाहीर लिलाव

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी लिलाव, उपसरपंचपद साडेदहा लाखांत

0

नांदेड : लोकशाहीची क्रूरचेष्टा करणारा एक व्हिडीओ सध्या नांदेडमध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैशाची सोय याची प्रचिती देणारा हा व्हिडीओ आहे. नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वी सरपंच आणि उपसरपंचपदाचा जाहीर लिलाव करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुदखेड तालुक्यातील महाटी गावातील हा व्हिडीओ असून यात गावातील उपसरपंचपदासाठी चक्क बोली लावण्यात आली आहे. महाटी या गावातील सरपंचपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे उपसरपंचपद आपल्या ताब्यात राहावे, यासाठी काही धनदांडग्यानी ही बोली लावली आहे. त्यात उपसरपंचपदाची साडेदहा लाखाला विक्री झाली आहे. गावात वीटभट्ट्या आणि रेतीचा व्यवसाय तेजीत असून त्यात रग्गड कमाई होते. त्यासाठी हा लिलाव करण्यात आला आहे. गावचे पुढारी निवडण्यासाठी लोकशाहीत मतदानाचा अधिकार गावकऱ्यांना असतो. मात्र गावातील इरसाल पुढारी लोकशाहीचे लोणचे बनवून तिला तोंडी लावताना दिसत आहेत. त्यातून गावातील पुढारी पदाचा थेट लिलाव केला जात आहे. या लिलावातून आलेल्या पैशातून गावातील शाळा डिजीटल करणार असल्याचे गोंडस कारण स्थानिक सांगत आहेत. पण अशा लिलावाच्या पैशातून बनलेल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी काय आदर्श घेतील, याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे अशाप्रकारे लिलाव करणाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गोदावरी नदीच्या समृद्ध काठावर महाटी गाव वसलेले आहे. नांदेडपासून जवळच असलेल्या या गावाचा एकेकाळी मुख्य व्यवसाय हा शेती होता. मात्र आता या गावात गोदावरी नदीची मुबलक माती उपलब्ध असल्याने असंख्य वीटभट्ट्या तयार झाल्या आहेत. तसेच गोदावरी नदीपात्रातून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या दोन्ही व्यवसायातून कोट्यावधींची उलाढाल होत असल्याने गावात पैशाचे झरे वाहत आहेत. त्यातूनच गावातील पुढारीपणाचा थेट लिलाव करण्याचे धाडस या गावात झाले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.