अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून, नव्या उमेदीने संकटाशी लढा देण्याचे आश्वासन- जिल्हाधिकारी
मुख्यमंत्र्यांना कामकाज नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पुरविली माहिती
औरंगाबाद : कोरोनाच्या परिस्थितीत अगदी साधेपणाने अन् स्वागत समारंभ टाळून पहिल्या मिनिटापासून कार्यास सुरू करणार्या नव्या जिल्हाधिकार्यांना पहिल्या बारा तासांतच थेट मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग करावे लागले. एखाद्या आयएएस अधिकार्याबाबत घडलेला हा दुर्मिळ प्रसंगच म्हणावा लागेल. असा योगायोग नवे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना आला. काही तासाभराच्या आढावा बैठकीनंतर त्यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीला सामोरे जावे लागले.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले महावितरणचे सहाय्यक संचालक सुनील चव्हाण काल वृक्षारोपण करून उसंत घेत कार्यालयात बसले होते. दुपारी दीडच्या सुमारास नियुक्तीचे आदेश धडकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेश दिल्याने लगोलग साडेतीनच्या सुमारास त्यांनी पदभार स्वीकारला. तोपर्यंत या नव्या नियुक्तीची माहिती सर्व विभागांना मिळाली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास काही प्रमुख अधिकार्यांसोबत बैठक घेत नव्या जिल्हाधिकार्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. अधिकार्यांचे मनोबल वाढवत नव्या उमेदीने संकटाचा सामना करण्याचे आश्वासन सर्वांना दिले. मागील आठ दिवसांपासून नव्या जिल्हाधिकार्यांच्या प्रतीक्षेत असलेले जिल्हाधिकारी कार्यालय आज कमालीचे सतर्क झाले होते. वरिष्ठ अधिकार्यांना निरोप गेल्याने बहुतेक सर्व अधिकारी साडेनऊच्या सुमारास कार्यालयात हजर झाले. तर स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या ठोक्याला दालनात हजर झाले. काल एका तासांच्या बैठकीनंतर आज सकाळी पुन्हा सव्वा दहाच्या सुमारास बैठकांचा धडाका सुरू झाला. शहरासह ग्रामीण भागातील संसर्गाची परिस्थिती, आकडेवारी जिल्हाधिकार्यांनी जाणून घेतली. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनील चव्हाण यांना क्षणाचीही उसंत मिळाली नाही. काल तासाभराच्या बैठकीनंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयाचा निरोप धडकला. त्यानुसार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणार असल्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार तातडीने सर्व विभाग प्रमुखांना सकाळी 10 वाजताच बैठकीचे आदेश देण्यात आले. सकाळी दोन तास आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग करण्याची तयारी केली. पदभार स्वीकारताच, पहिल्या बारा तासांत थेट मुख्यमंत्र्यांना माहिती देण्याचे खडतर आव्हान नव्या जिल्हाधिकार्यांना पेलावे लागले.