पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधणार
'मन की बात', कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 सप्टेंबर) ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविषयी बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरातील शेतकरी कृषी विधेयकाचा विरोध करत आहेत. त्यामुळे मोदी कृषी विधेयकावरून देशवासियांना संबोधन करू शकतात. (
आज सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित होतो. आज प्रसारित होणार कार्यक्रम हा 69 वा असणार आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी त्यांच्या ट्विटरवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचे आवाहन केले आहे. कोरोना काळात मोदींनी सतत जनतेशी संवाद साधला आहे. आज ते नेमके कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी विधेयक, शेती आणि शेतकरी या विषयांवर बोलण्याची शक्यता आहे. यासोबतच कोरोना महामारी आणि भारत-चीन सीमावादावरही मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे. गेल्या मन की बात या कार्यक्रमातून आत्मनिर्भर भारत यावर चर्चा केली होती. आता सर्वांना लोकल टू व्होकल व्हावं लागणार आहे. भारतीय बाजारपेठा या चीनी खेळण्याच्या वस्तूंनी व्यापल्या आहेत. त्यामुळे देशवासियांना मिळून काही नवीन खेळाचे प्रकार बनवले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.
कृषी विधेयकाला विरोध का?
कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचे सांगून रद्द करण्याची मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची आहे. दुसरीकडे भाजपने कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्याच बाजूनं असल्याचा दावा केला. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना देशात कोणत्याही राज्यात शेतमाल विकता येणार आहे. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या चक्रातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदीदारासोबत पाच वर्षांसाठी शेतमालाचा करार करता येणार आहे. शेतकरी बंधनमुक्त होईल आणि कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल. पण यामुळे शेतीमालाला एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत मिळणार नसल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे.