वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांची खरमरीत टीका
सोलापूर : ‘तीन पायाचे सरकार त्यातील एक किंवा दोन पाय तिसऱ्या पायाला दबाव टाकत आहेत. कुठल्याही पद्धतीने अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करू नये आणि साखर कारखान्यांना आपल्याला अनुदान जाहीर करायचे आहे. ओला दुष्काळातील लोकांना मदत न करता साखर कारखान्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आमचा आरोप आहे,’ असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघात केला आहे.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यावरून राज्य विरुद्ध केंद्र, असा संघर्ष उभा राहिल्याचे दिसत आहे. तसंच राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर नवा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. 25 ऑक्टोबरला ऊसतोड कामगार, मुकादम आणि बैलगाडी वाहकांची परिषद घेणार, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून केली आहे. भगवानगडाच्या पायथ्याला ही परिषद होणार आहे. पाच वर्षांपूर्वी झालेला करार आता पूर्ण झाला. त्यामुळे आता त्याचा फेरविचार व्हावा, यासाठी परिषद आहे, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ऊस तोडणीबाबत नवा करार होत नाही तोपर्यंत ऊसतोड कामगार संपावर जाणार, असेही सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी खरमरीत टीका केली. एखादा दारुडा दारु पिण्यासाठी बायकोला मारतो नंतर दारुसाठी घर विकतो त्याप्रमाणे मोदी आहेत,’ असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.