पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम
यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोड या तरुणीचा गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर
यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील गुंता सुटण्याऐवजी वाढत चालला आहे. कारण यवतमाळमधील वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरुण राठोड या तरुणीचे अबॉर्शन अर्थात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये पूजा अरुण राठोड असे नाव आहे, मात्र हीच पूजा लहू चव्हाण आहे का हे अधिकृत स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहितींचा घटनाक्रम आता पुढे येत आहे.
यातील पूजा आणि अरुण ही तीच नावे आहेत, ज्यांचा या आत्महत्याप्रकरणात थेट संबंध आहे. विशेष म्हणजे पूजा अरुण राठोडचा गर्भपात ते पूजा लहू चव्हाणची आत्महत्या या दोन्ही घटनांमध्ये जवळपास 45 तासांचे अंतर आहे. डॉक्टर दप्तरी नोंदीनुसार पूजा अरुण राठोडला 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी अॅडमिट केले होते. पूजा वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भरती होती. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्भपात करण्यासाठी पूजा दाखल झाली होती. तिथे पूजा अरुण राठोड, असे नाव नोंदवण्यात आले. दुसरीकडे पुण्यात पूजा लहू चव्हाण या परळीच्या तरुणीने 7 फेब्रुवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली. आता पूजा अरुण राठोड आणि पूजा लहू चव्हाण एकच आहेत का? एकच असेल तर गर्भपातानंतर पूजाने पुण्यात येऊन आत्महत्या केली का? ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडने कथित मंत्र्यांशी बोलताना पूजा आत्महत्या करण्यावर ठाम असल्याचा उल्लेख केला होता, तो याच पूजाबाबत आहे का? असे प्रश्न आहेत.
पूजा राठोड गर्भपात ते पूजा चव्हाण आत्महत्या घटनाक्रम : – पूजा अरुण राठोड 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी रुग्णालयात दाखल झाली. – यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरुण राठोड या तरुणीचे अबॉर्शन अर्थात गर्भपात झाले. -मेडिकल रिपोर्टमध्ये पूजा राठोडचा जो पत्ता आहे, त्यामध्ये शिवाजीनगर नांदेड, इतकाच उल्लेख आहे.
– इकडे 7 फेब्रुवारीला रात्री दीड वाजता पुण्यात पूजा लहू चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. – पूजा अरुण राठोड या तरुणीचे वय 22 वर्षेच आहे, तर पूजा लहू चव्हाण हिचे वयही 22 वर्षेच होते. – गुगल मॅपनुसार यवतमाळ ते पुणे 573 किलोमीटर अंतर आहे. – अंदाजे हे अंतर पार करण्यासाठी सुमारे साडेबारा तासांचा रस्ते प्रवास करावा लागतो. – पूजा राठोडला रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळाला? – जर पूजा राठोड हीच पूजा चव्हाण असेल, तर गर्भपातानंतर तिने लगेचच प्रवास सुरू केला का? – 6 तारखेला गर्भपात झाल्यानंतर, पूजा पुण्यात नेमकी कधी पोहोचली? हे सर्व प्रश्न तिथेच येतात, पूजा राठोड आणि पूजा चव्हाण एकच आहेत का? अरुण राठोड कोण आहे?
या तरुणीचे अबॉर्शन अर्थात गर्भपात केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. भाजपने रीतसर तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलिस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतके सगळे होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.
पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो? : पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्येतून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू, अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचे म्हटलेले नाही.