पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, दोन्ही प्रकरणांत एकच नाव, कोण आहे अरुण राठोड?
पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अरुण राठोडला घेतले ताब्यात
पुणे : पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अरुण राठोड याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आज गुरुवारी 18 फेब्रुवारीला अरुणला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पूजाने 7 फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली होती. त्यानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, त्यामध्ये कथित मंत्री आणि अरुण राठोड यांची नावे होती. मात्र अरुण राठोड गायब होता, त्याला अखेर पोलिसांनी पकडले आहे.
अरुणला पकडताना पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. अरुण राठोडची चौकशी थेट पुणे पोलिस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.
अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला. पोलिस अहवालात विजय चव्हाणहीसोबत असल्याचा उल्लेख आहे. नुकतेच पूजा अरुण राठोड या तरुणीच्या गर्भपाताचा अहवाल समोर आला होता. या प्रकरणातही अरुण राठोड हे नाव होते. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या आणि पूजा राठोड गर्भपात या दोन्हींतील समान धागा होता तो म्हणजे अरुण राठोड. आता यालाच ताब्यात घेतल्याने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गुंता सुटण्याची आशा आहे.
कोण आहे अरुण राठोड?
अरुण राठोड हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी आहे. परळीच्या दारावती तांडा येथे त्याचे घर आहे. तो शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. तो संजय राठोड यांच्या अत्यंत जवळचा असून राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संजय राठोड यांच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयातही अरुणचा मुक्तसंचार असल्याने तो मंत्र्याचा किती जवळचा आहे, हे दिसून येते.
पुण्यात राहत होता पूजासोबत
अरुण राठोड हा पुण्यात पूजा चव्हाणसोबत राहत होता. पूजाला काय हवे नको ते देण्याचे काम त्याच्याकडे होते असे सांगितले जाते. पूजाच्या राहण्याची व्यवस्था मंत्रिमहोदयांनी अरुण राठोड याच्याकडे सोपवल्याची प्राथमिक माहिती आहे. अरुण राठोड आणि पूजा चव्हाण यांचे नात्याने कोणतेही नातेसंबंध नसल्याचे सांगितले जाते. पण पूजा अरुण राठोडचा गर्भपात झाल्याने, हा तोच अरुण राठोड आहे का हा नव्याने पडलेला प्रश्न आहे.
पूजा अरुण राठोडचा गर्भपात
दरम्यान, काल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला होता. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले.
दोन्ही प्रकरणांत अरुण राठोडचे नाव
दरम्यान, पूजा चव्हाणसोबत अरुण राठोड राहात होता. तर पूजा अरुण राठोडने गर्भपात केला, त्यामध्येही अरुण राठोडचे नाव आहे. त्यामुळे दोन्ही पूजा आणि दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का, याचा तपास आता पोलिस करतील.
दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडचे नाव आले आहे. हा अरुण राठोड बीडचा असून वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर यवतमाळमधील अरुण राठोड याचा पत्ता शिवाजीनगर, नांदेड, असा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणांतील अरुण राठोड एकच आहेत की दोन्ही वेगळे आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूजा अरुणच्या संपर्कात
परळीत राहून भाजपमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर पूजा चव्हाण ही संजय राठोड यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. संजय राठोड हे शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. राठोड यांच्या संपर्कात आल्यानंतर पूजा चव्हाण हिचे कर्तृत्त्व आणखी उजळले. याच काळात ती यशाच्या अनेक पायऱ्या चढत वर गेली. राठोड यांनी पूजाची सर्व जबाबदारी अरुणकडे सोपवली होती. पूजाला मॉडेलिंग करायची होती. त्यात अरुण तिला मदत करत होता. त्यामुळे हे दोघेही पुण्यात एकत्र राहू लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
पूजाचा भाऊ असल्याचा बनाव
अरुण राठोड याचा पूजाशी काहीही संबंध नव्हता. तो पूजाचा नातेवाईक नव्हता. पण बाहेर वावरताना पूजाचा चुलत भाऊ असल्याचे तो सांगायचा. पूजाला एकूण सहा बहिणी आहेत. पूजा ही पाचवी आहे. तिच्या चारही बहिणींचे लग्न झालेले आहे. तिला भाऊ नाही. मात्र, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अरुण हा पोलिसांना तो पूजाचा चुलत भाऊ असल्याचे सांगत असल्याचे ऐकायला मिळते.
अरुण राठोडची ऑडिओ क्लिप
अरुण आणि संजय राठोड यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. अरुण राठोड हा पूजा चव्हाणसोबत राहात होता. एव्हाना तिची जबाबदारी अरुणवरच होती. पूजा थोडी सर्किट आहे म्हणजे हट्टी आहे. ती ऐकणार नाही, असे अरुण मंत्र्याला सांगतो. यावरून पूजाने एकदा निर्णय घेतला तर ती मागे हटत नाही, हे त्याला माहीत असल्याचे स्पष्ट होते. तसेच पूजासोबत त्याची पूर्वीपासूनच ओळख असावी, असाही अंदाज या क्लिपमधील संभाषण ऐकल्यावर येतो.
‘त्या’ व्हायरल क्लिपमध्ये काय संभाषण झाले होते?
पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर एकूण 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यात अरुण चव्हाण आणि कथित मंत्र्याचे कथित संभाषण होते. त्यात पूजाच्या उपचाराबाबत दोघांनीही चर्चा केली होती. ट्रिटमेंट घेतल्यानंतर आत्महत्या करणार असल्याचे पूजाने या अरुणला सांगितले होते. तसेच पूजाने एक किट आणून काही तपासणी केली होती. ती किट पॉझिटिव्ह आल्यानंतर अरुण घाबरला होता. त्यामुळे पूजावर नेमका कोणता उपचार सुरू होता? अरुण का घाबरला होता? असा असा सवालही केला जात आहे.
पूजा चव्हाणची आत्महत्या
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात राहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.