पोलिसांचा सिनेस्टाइल पाठलाग; वैजापूर येथे दोन चोरट्यांना अटक; 25 लाखांच्या लुटीचा छडा

चोरट्यांनी कारमधून औरंगाबादच्या व्यापाऱ्याची लांबवली होती रक्कम

0

परळी  : औरंगाबाद येथील प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या कारमधून परळीत चोरट्यांनी २५ लाख रुपये लांबवल्याची घटना गुरुवारी घडली होती. परळी पोलिसांनी तब्बल आठशे किलोमीटर सिनेस्टाइल पाठलाग केल्यानंतर वैजापूर परिसरात दोन चोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
औरंगाबादेतील मित्रनगर येथील व्यापारी संजय इंदरचंद गंगावाल हे मराठवाड्यात २० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करतात. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ते औरंगाबादहून कारने (एमएच २० इजे ५७७१) परळी शहरात आले होते. शहरातील मोंढा भागातील हनुमान मंदिराजवळ त्यांनी आपली कार उभी करून ते व्यापाऱ्यांकडे वसुलीसाठी गेले होते. दरम्यान, कारचालक बाजार समितीच्या आवारातील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यास गेला. याचवेळी चोरांनी कारच्या आतील सीटवरील बॅगमध्ये असलेले रोख २५ लाख रुपये लांबवले. कारचालक जेव्हा नाश्ता करून कारजवळ आला तेव्हा त्याला सीटवरील २५ लाख रुपये असलेली बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याने व्यापारी संजय गंगवाल यांना फोन करून पैशाची बॅग चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानंतर गंगवाल यांनी परळी शहर पोलिसांना फोन करून चोरीच्या घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी परळी शहर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी संजय गंगावाल यांच्या तक्रारीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर परळी शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. परळी शहर पोलिसांना रक्कम लुटीच्या प्रकरणातील चोरटे वैजापूर (जि. औरंगबाद) परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन्ही चोरांचा आठशे किलोमीटर सिनेस्टाइल पाठलाग करून दोन्ही चोरांना पकडले. पोलिसांनी चोरांकडून २४ लाख ८ हजार रुपयांसह गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली. संतोष एकनाथ पाटील (४० ), पंढरीनाथ जतन प्रेमभरे (२३, दोघे रा. तुर्काबाद खराडी ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २४ लाख ८ हजार रुपयांसह गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. ही रक्कम लुटण्यासाठी चोरांनी तीन दिवस पाळत ठेवली होती हे तपासात उघडकीस आले. ही कारवाई परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनात डी. बी. पथकाचे पोलिस जमादार भास्कर केंद्रे, सुंदर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, हनुमान मुंडे आदींनी केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक खरात करत आहेत.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडली घटना, दोन आरोपींना केली अटक

दिवाळीच्या पूर्वसंध्येला परळी शहरात सकाळी व्यापाऱ्याचे २५ लाख रुपये लुटीच्या घटनेमुळे व्यापारीवर्गात दहशत निर्माण झाली होती. परळी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हा गुन्हा उघडकीस आणून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे परळी शहरवासीयांसह व्यापाऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.