चौकीदार झोपत नाही, अंधारात चोरांना पकडतो, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका
सोलापूर : सोलापूर जनतेच्या विकासाऐवजी केवळ राजकारणातच अडकलेल्या कमिशनखोर आणि दलालांना विरोधकांना देशाची चिंता नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते आज सोलापूर दौ-यावर आहेत.
2022 मध्ये मीच सोलापूरमध्ये तीस हजार घरांचे पंतप्रधान म्हणून उद्घाटन करणार असल्याची त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी त्यांनी 6 वेगवेगळ्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या स्टेडिअमवर हजारो लोकांनी गर्दी केली होती.
यावेळी मोदींनी मराठी भाषेतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी राफेल, ऑगस्टा वेस्टलँड, आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण या मुद्दयांना हात घातला. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
चौकीदार झोपत नाही तो अंधारात चोरांना पकडतो…
मोदी म्हणाले, ‘हेलिकॉप्टर घोटाळ्यात सामील दलाला पकडून भारतात आणले. जेलमध्ये कैद असलेल्या दलालाने धक्कादायक खुलासा केला. तो केवळ हेलिकॉप्टर डीलमध्ये सहभागीच नव्हता तर आधीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत लढाऊ विमानांचा जो सौदा झाला होता, त्यातही त्याची भूमिका होती. मिशेल मामाचा काँग्रेसशी काय संबंध आहे? चौकीदाराने जाग राहाव की झोपाव? तुमच्या आशीर्वाने चौकीदार आतापर्यंत लढत आहे. चौकीदार झोपत नाही तो अंधार झाल्यानंतर चोरांना पकडतो.’
पुढे मोदी म्हणाले, ‘बुधवारी म्हणजे आज राज्यसभेत 10 टक्के सवर्णांच्या आरक्षणाचा ठराव मंजूर केला जाईल. त्यासाठी अधिवेशनाची वेळही वाढवली आहे. मागासवर्गीय, आदिवासी आणि ओबीसी वर्गाला त्रास न देता सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिल्याने विरोधकांना कडक उत्तर दिले आहे.’ असेही ते म्हणाले.
30 हजार घरांचे लोकार्पण मीच करेल…
‘2004 ते 2014 या काळात आघाडी सरकारने गरिबांना 13 लाख घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी केवळ 8 लाखच घरे बांधली. मात्र एकट्या सोलापूरात आम्ही तीस हजार घरे बांधत आहोत, एवढ्या जलद गतीने विकास होतोय याचा अर्थ आम्ही कमिशन खात नाही. आम्ही दलाली मागत नाही. आम्ही केवळ भूमिपूजन करून वेळ मारून नेत नाही. विरोधकांसारखे आमचे काम नाही. जिथे आम्ही भूमीपूजन करतो तिथे आम्हीच लोकार्ण सोहळाही करतो. येत्या 2022 मध्ये आम्हीच सोलापूरात 30 हजार घरांचे लोकार्पण मीच करेल’, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना पुणेरी पगडी, घोंगडे, भगवद्नीता आणि तलवार देण्यात आली. व्यासपिठावर राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शरद बनसोडे, माजी आमदार नरसय्या आडम आणि महापौर शोभा बनशेट्टी यांची उपस्थिती होती.