लातुर : लातुरात डॉक्टरांकडून भुलीचं प्रमाण जास्त झाल्याने लातुरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. किरकोळ फ्रॅक्चरसाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णाला जास्त भूल दिल्याने रुग्णाला जिवाला मुकावे लागले आहे. मात्र तीन दिवसांनंतरही डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथल्या रेवती गावकरे या 27 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला आपल्या जिवास मुकावे लागले असल्याचा गंभीर आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. भूल तज्ञाच्या छोट्याश्या चुकीमुळे रेवतीचा, असा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. रेवतीला हाताच्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याने लातूरच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आपल्या-आई वडिलांसोबत स्वतः दवाखान्यात गेलेल्या रेवती यांना डॉक्टरांनी छोटेसे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. निसटलेल्या हाडाला पूर्ववत करण्यासाठी ही शस्त्रक्रिया गरजेची असल्याची डॉक्टरांनी रेवती यांना सांगितले. शस्त्रक्रिया करताना त्यांना भूल इंजेक्शन दिले गेले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र चार-पाच तास झाले तरी रेवती शुद्धीवर आल्याच नाहीत. रुग्ण शुद्धीवर येत नसल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना विचारायला सुरुवात केली. डॉक्टर मात्र रुग्ण लवकरच शुद्धीवर येईल, असे सांगत राहिले. अखेर 12 तास उलटल्यानंतर डॉक्टरांनी अॅम्ब्युलन्स मागवून स्वतःच हा रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात पाठवला. मात्र तिथे हा रुग्ण केव्हाच मृत झालेला आहे. त्याला भरती करता येणार नाही, असे सांगण्यात आले. भूल तज्ज्ञाच्या छोट्याशा चुकीमुळे रेवतीला, असा दुर्दैवी मृत्यू आला आहे. तिची दोन मुले मातृत्वालाा मुकली आहेत. आता या प्रकरणी रेवतीच्या वडिलांनी लातूरच्या एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. मात्र या घटनेला तीन दिवस उलटले तरी डॉक्टरांवर गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिस ठाण्याचे अधिकारी आजारी असल्याने दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.