नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम, भाजपकडून उद्घाटनांचा धडाका; शिवसेनेचा आक्षेप

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 22 फेब्रुवारीला नाशिकमध्ये 250 कोटींची कामे आणि 2 उड्डाणपुलांचे भूमिपूजन

0

नाशिक : महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या गोटात आता हालचाली वाढल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या 22 फेब्रुवारीला नाशिकमध्ये 250 कोटी रुपयांची कामे आणि 2 उड्डाणपुलांचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, शिवसेनेने मात्र भाजप आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे शिवसेनेने चौकाचौकांत शाखा उद्घाटनाचा धडाका लावला. तर दुसरीकडे भाजपने आता ‘मौका देख के चौका’ मारण्याचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून 22 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये 2 उड्डाणपूल आणि अडीचशे कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन होणार आहे. शिवसेनेकडून मात्र भाजपच्या या उद्घाटन कार्यक्रमावर आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे होत असलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. सिडको उड्डाणपुलावरुन यापूर्वीच शिवसेना आणि भाजप आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता नाशिक भाजपने फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची तारीखच जाहीर केली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल, याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत 14 फेब्रुवारी रोजी नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथील कार्यालयात आढावा बैठक पार पडली, यावेळी भुजबळांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा – राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील नाशिक महापौर शिवसेनेचा होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच दंगल सुरू झाली. राऊत कुठल्या जोरावर ही गोष्ट बोलताहेत हीच कल्पना विरोधकांना येत नाही. त्यामुळेच राऊतांच्या दाव्याविषयी तर्कवितर्क लावण्यास उधाण आले.

तिकडे मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची कसून तयारी करतेय. भाजपने मनसेचे अनेक नगरसेवक पळवले. त्यामुळे स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. मात्र, असे असले तरी मनसेची भूमिका ‘कृष्णकुंज’वरच ठरणार आहे.

नाशिक मनपामध्ये पक्षीय बलाबल

भाजप – 65, शिवसेना – 35, राष्ट्रवादी – 6, काँग्रेस – 6, मनसे – 6, रिपाइं – 1

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.