राज्यभरात 3 नोव्हेंबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

सर्व तहसीलदार कार्यालयांना निवेदन देण्याची घोषणा, व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रमुख प्रकाश शेंडगे

0

मुंबई : राज्यभरात 3 नोव्हेंबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. आम्ही राज्यभरातील सर्व तहसीलदार कार्यालयांना याबाबतचे निवेदनदेखील देणार असल्याची घोषणा आज व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रमुख प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

प्रकाश शेंडगे म्हणाले की, सध्या राज्यभरात मराठा समाजातील काही प्रमुख नेते मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी कोट्यातून द्या, अशी मागणी करत आहेत. याला सर्व ओबीसी समाजाचा विरोध आहे. ज्यावेळी मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले होते. त्याचवेळी आम्हांला माहिती होते की, हे आरक्षण टिकणारे आरक्षण नाही. त्यामुळेच आम्ही सरकारकडे विचारणा केली होती की, जर एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मग सरकार पुढचे पाऊल काय टाकणार आहे. परंतु, सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता आली नाही. आज परिस्थिती पाहिली तर वेगळी आहे. आता मराठा समाजातील काही प्रमुख नेते उघड उघड ओबीसी समाजातून आरक्षण देण्याबाबत बोलत आहेत. त्यामुळे याबाबत सरकारने स्पष्टता आणावी आणि लवकरात लवकर मराठा समाजातील या नेत्यांना बोलावून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणार नसल्याची बाब माहिती करून द्यावी. सध्या राज्यभरात ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत, त्यावरून आम्ही आता 3 नोव्हेंबरपासून राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करणार आहोत. या माध्यमातून राज्यभरातील सर्व तहसीलदार कार्यालयात आमचे कार्यकर्ते जाऊन तहसीलदारांना निवेदने देतील. यामध्ये प्रामुख्याने आम्ही ओबीसी कोट्यातुन मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, ओबीसी समाजालादेखील मराठा समाजाला ज्या पद्दतीने निधी दिला आहे. त्याच पद्दतीने निधी द्यावा. अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत प्रकाश शेंडगे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश शेंडगे हे ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, सध्या राज्यभरात अनेक मराठा हे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे याबाबत भूमिका घेतं आहेत, हे उघड आहे. त्यामुळे उलट माझ्यावर आरोप करण्यापेक्षा जयंत पाटील यांनी त्या नेत्यांची समजुत काढावी. आपोआपच आमचा विरोध मावळल्याचे पाहायला मिळेल. आम्ही 3 नोव्हेंबरपासून राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करणार आहोत. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश शेंडगे यांनी ही घोषणा केली. यावेळी दामोदर तांडेल, चंद्रकांत बावकर, महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नतीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष शांताराम दिघे, जीडी तांडेल उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.