सलामीवीर फलंदाज शुभमन गिल व इयन मॉर्गनने विजयासाठी रचला पाया
कोलकाताची हैदराबादवर सात विकेटने मात
अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेटने पराभव केला आहे. कोलकाताने 18 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 143 धावांचं विजयी आव्हान पूर्ण केलं. कोलकाताने एकूण 145 धावा केल्या. युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि इयन मॉर्गन या दोघांनी कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी केली.
कोलकाताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर इयन मॉर्गने 42 धावा करत गिलला चांगली साथ दिली. हैदराबादकडून खलील अहमद, टी नटराजन आणि रशिद खान या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या कोलकाताची खराब सुरुवात झाली. कोलकाताची पहिली विकेट 6 धावांवर गेली. सुनील नारायणला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर नितीश राणा मैदानात आला. राणा आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. कोलकाताला नितीश राणाच्या रुपात दुसरा धक्का लागला. नितीश राणा 26 धावांवर बाद झाला. यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार दिनेश कार्तिक आला. कार्तिकने घोर निराशा केली. कार्तिक तिसऱ्या बॉलवरच एलबीडबल्यू बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. कार्तिक बाद झाल्याने कोलकाताची 53-3 अशी परिस्थिती झाली होती. मात्र यानंतर मैदानात आलेल्या इयन मॉर्गनने शुभमन गिलला चांगली साथ दिली. गिल आणि मॉर्गनने कोलकाताला विजयापर्यंत नेले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून शुभमन गिलने नाबाद 70 धावा केल्या. तर इयन मॉर्गननेही 42 नाबाद धावा केल्या. याआधी हैदराबादने टॉस जिंकला. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 142 धावा केल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने सर्वाधिक धावा केल्या. पांडने अर्धशतक लगावले. त्याने 51 धावांची खेळी केली. तसेच वॉर्नरने 36 तर ऋद्धीमान साहाने 30 धावांची खेळी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्थी आणि आंद्रे रसेल या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.