कोल्हापूर : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे.
सर्व शैक्षणिक संस्थांमधील 9 सप्टेंबर 2020 नंतरची सर्व प्रवेशप्रक्रिया एसईबीसी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण न ठेवता पार पाडण्याचे निर्देश सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केला असेल मात्र अद्याप प्रवेश दिला गेला नसेल तर अशा एसईबीसी विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान,या पार्श्वभूमीवर “राज्य सरकारचा मराठा समाजाप्रति असलेला द्वेष सारखा दिसून येत आहे. सरकार पुन्हा पुन्हा मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत आहे. यांचे सर्वच निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक ठरत आहेत. सर्व संघटनांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला, तर भाजपा या आंदोलनाचे नेतृत्व करण्यास तयार आहे.” असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.