औरंगाबादमध्ये आजपासून 14 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी; रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद
जीवनावश्यक वस्तूंसह उद्योग व कर्मचाऱ्यांना सूट, पुढील टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडईबाबत निर्णय
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता, अखेर संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी दिवसा नाही तर रात्रीची असणार आहे. यामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांना बाहेर पडता येणार नाही. या दरम्यान, जीवनावश्यक वस्तू, उद्योग आणि कर्मचाऱ्यांना मात्र सूट देण्यात आली आहे. बैठकीत झालेल्या रात्रीच्या संचारबंदीचे आदेश आजपासूनच लागू केले जाणार आहेत.
जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीमध्ये मंगळवारी (23 फेब्रुवारी) घेण्यात आला आहे. पुढील टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडई बाबत निर्णय होणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. यास आळा घालण्यासाठी मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी शासन आदेशानुसार सोमवारी आदेश काढून सर्वच प्रकारचे धार्मिक, सामाजिक, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विवाह समारंभासाठी 50 व्यक्तींना उपस्थिती राहण्यास परवानगी असणार आहे. या पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास संबंधीत संस्था, संचालक, मालकांवर दंडात्क कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शहरात आतापर्यंत चार लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या मनपाकडे 50 हजार अँटीजन आणि आरटीपीआर किट उपलब्ध आहेत. नवीन नियमानुसार आता ज्यांची तपासणी केली, त्यांना घरातच 24 तास क्वारंटाईन करुन ठेवणार आहेत. नागरिकांना टेस्टची सुविधा 15 केंद्रांवर करण्यात आली आहे. त्यापैकी चार केंद्रांवर 24 तास तपासणी करण्यात येणार आहे.