बिहार काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार बैठकीत तुफान हाणामारी

अवघ्या १९ जागांवर विजय , काँग्रेसमध्ये गटनेताच्या वादावरून दोन गटांत बाचाबाची

0

पाटणा : नुकत्याच जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर एकीकडे राज्यात नवे सरकार स्थापन्यासाठी एनडीएचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे बिहार काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शुक्रवारी जोरदार हाणामारी झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस गटनेता निवडीवरून हा वाद उभा राहिला. बैठकीत नवनिर्वाचित काँग्रेस उमेदवार विजय शंकर दुबे यांना ‘चोर’ म्हटल्यानंतर सुरू झालेली बाचाबाची हाणामारीपर्यंत पोहोचली.

बिहार निवडणुकीनंतर शुक्रवारी राज्याची राजधानी पाटणामध्ये पुढच्या आखणीसाठी काँग्रेस नवनिर्वाचित आमदारांची एक बैठक बोलावण्यात आली होती. काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या सदाकत आश्रमात आज ही बैठक भरली होती.या बैठकीसाठी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित आमदारही हजर झाले होते. परंतु, या बैठकीत नेत्यांचे आपापसांतील वाद स्पष्टपणे समोर आले.काँग्रेस गटनेता बनण्यासाठी सुरू झालेल्या स्पर्धेनंतर उभा राहिलेला वाद पहिल्यांदा शिवीगाळ आणि नंतर मारामारीपर्यंत पोहोचला.महाराजगंज मतदारसंघाचे विजयी उमेदवार विजय शंकर दुबे आणि विक्रम मतदारसंघाचे विजयी उमेदवार सिद्धार्थ यांच्यात काँग्रेस गटनेता बनण्यासाठी हा वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यांच्या समर्थकांकडून विजय शंकर दुबे यांना ‘चोर’ असे संबोधण्यात आले. यामुळे हा वाद आणखीनच पेटला.उल्लेखनीय म्हणजे, या बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसच्या स्क्रिनिंग समितीचे अध्यक्ष अविनाश पांडेदेखील उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये काँग्रेसला फारसे यश मिळालेले दिसत नाही. काँग्रेसने यंदा ७० जागा लढवल्या परंतु, केवळ १९ जागांवर विजय संपादन करण्यात पक्ष यशस्वी ठरला. २०१५ साली काँग्रेसने २७ जागांवर विजय मिळवला होता.दुसरीकडे, शुक्रवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. एनडीएच्या १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढच्या बैठकीत नवा नेता निवडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.