शिवसेनेच्या फोडाफोडीमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ; बदलापुरात ‘महाविकास’ला तडे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष कविता पाटील यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई : अंबरनाथ, बदलापूर पालिकांच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे, या संभ्रमात कार्यकर्ते असले तरी तिन्ही पक्ष एकमेकांवरील कुरघोड्या टाळत आहेत. मात्र, बदलापुरात महाविकास आघाडी निर्माण होण्यापूर्वीच बिघाडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष कविता पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी हा प्रवेश घडवून आणला.

बदलापुरात महाविकास आघाडी निर्माण होण्यापूर्वीच बिघाडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष कविता पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी हा प्रवेश घडवून आणला. शिवसेनेकडून आघाडीधर्म पाळला जात नसल्याच्या भूमिकेवरून बदलापुरातील राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली असून शिवसेनेच्या आजी- माजी नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत आम्हालाही भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते न पळवण्याचा आणि पक्षांतर न घडवून आणण्याबाबत तीनही पक्ष काळजी घेत आहेत. त्यात काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायतीत शिवसेनेतून अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी अवघ्या एका दिवसात पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर राज्यभरातील महापालिका ते ग्रामपंचायत स्तरावर महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पळवापळवी होऊ नये, यासाठी तिन्ही पक्षांचे नेते खबरदारी घेत आहेत. बदलापुरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठक घेऊन शहरात महाविकास आघाडीसाठी मित्र पक्षांसोबत समन्वय साधण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे बदलापुरातील नेते महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याची भूमिका घेत असतानाच बदलापुरातील शिवसेना मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पळवण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. बदलापुरातील राष्ट्रवादीच्या महिला शहर कार्याध्यक्ष कविता पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश घडवून आणण्यात शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते. मात्र, केवळ राष्ट्रवादीनेच महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा का, असा सूर आता बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी काढत आहेत.
‘आमच्याही संपर्कात सेनेचे नेते’ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आशीष दामले यांना विचारले असता, या प्रवेशाबाबत आम्ही याबाबत आमच्या वरिष्ठांना कळवले असून ते शिवसेनेच्या वरिष्ठांसोबत चर्चा करणार आहेत. पारनेरच्या धर्तीवर येथेही महाविकास आघाडीचा समन्वय साधला जाईल. मात्र त्यानंतरही बदलापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पळवण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीच्याही संपर्कात शिवसेनेचे अनेक आजी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीही त्यांच्या प्रवेशाबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे दामले यांनी सांगितले. याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही. मात्र, बदलापुरात कार्यकर्ते पळवापळवीच्या भूमिकेमुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.