राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन

दहा दिवसांत कुटुंबातील तिघांना काळाने हिरावले

0

पंढरपूर : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजूबापू पाटील यांचे निधन झाले. कोरोनाच्या संसर्गानंतर राजूबापू पाटील यांची प्राणज्योत मालवली. दहा दिवसांत पाटील यांच्या कुटुंबातील तिघांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजूबापू पाटील यांचे सोलापूरमधील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. पंढरपूर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पाटील यांच्या कुटुंबातील चुलते, धाकटे बंधू महेश पाटील आणि आता राजूबापू यांचाही मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यामुळे पाटील कुटुंबासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. राजूबापू पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले होते, मात्र आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जनतेच्या अडीअडचणी तातडीने दूर करणारे नेते म्हणून ते लोकप्रिय होते.
राजूबापू पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जात. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या माध्यमातून त्यांनी ठसा उमटवला होता. नुकताच गूळ कारखाना काढून त्यांनी ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्या शिफारशीवरून आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी राजूबापू पाटील यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांचे वडील यशवंतभाऊ पाटील यांनीदेखील तब्बल 49 वर्षे रयत शिक्षण संस्थेचे सदस्यपद भूषवले होते. राजूबापू पाटील यांच्या निधनाने राजकीय नेत्यांपासून समर्थकांनी शोक व्यक्त केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.