ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचे समन्स; राष्ट्रवादीवर संक्रात?

मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात बजावण्यात आले हे समन्स

0

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावल्याचे सांगितले जाते. एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोंचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानवाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आले आहे.

राष्ट्रवादीवर संक्रात

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे झालेले आरोप ताजे असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्जप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकापाठोपाठ एक, अशा दोन प्रकरणांत अडकल्याने राष्ट्रवादीवर राजकीय संक्रात ओढावल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडेच राज्याचे गृहखाते असल्याने या दोन्ही प्रकरणांत राष्ट्रवादी काय कारवाई करते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.