‘लालदिव्या’साठी प्रदेशाध्यक्षपद नाकारल्याने नाथाभाऊंचे गेले मुख्यमंत्रिपद

प्रदेशाध्यपदाची ऑफर; पण तब्येतीचे कारण सांगून त्यांनी ते नाकारले ; दानवेंचा गौप्यस्फोट

0

मुंबई : पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचे कारण सांगून त्यांनी ते नाकारले. भविष्यात सत्ता येईल की नाही, असे नाथाभाऊंना वाटले. त्यामुळेच त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले असावे, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला.

रावसाहेब दानवे यांनी आज गौप्यस्फोट केला. नाथाभाऊ भाजप सोडून का गेले, याला अनेक कारणे आहेत. कुठून सुरुवात करावी हा प्रश्न आहे. एकेकाळी भाजपमध्ये केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. पण भाजपची सत्ता येईल की नाही, याची शंका असल्याने नाथाभाऊंनी तब्येतीचे कारण देत लालदिव्यासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडले. त्यामुळे हे पद देवेंद्र फडणवीसांकडे आले. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षालाच मुख्यमंत्री केले जाते. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याकाळात खडसेंनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले असते तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रिपदावर दावा करता आला असता, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने खडसे नाराज झाले होते. पण त्यांच्याकडे अर्ध्याहून अधिक महत्त्वाची खाती देण्यात आली. तरीही ते नाराज होते. त्यांनी फडणवीस सरकारशी जुळवून घेतले नाही. त्यांचे सरकारसोबत संबंध सुधारतील, असे वाटत नव्हते. नंतरच सर्व तुम्हाला माहीतच आहे, असे ते म्हणाले. नाथाभाऊ माझे जुने मित्र आहेत. त्यांच्यापेक्षा पक्षात मी सीनियर आहे. मी नाथाभाऊंच्या घरी आणि शेतातही जायचो. तेही माझ्या घरी यायचे. आमचे घरगुती संबंध आहेत. नाथाभाऊ दुसऱ्या पक्षात गेल्याचे दु:ख आहे. पण कोणतीही पोकळी निसर्गाला मान्य नसते. नेहरूनंतर पुढे कोण? असा प्रश्न होता. वाजपेयी-अडवाणींनंतर पुढे कोण? असाही प्रश्न होताच पण निसर्गाला पोकळी मान्य नसते या न्यायाने पर्याय मिळत गेले. उत्तर महाराष्ट्रात आमचे मोठे नेटवर्क आहे. गावागावात कार्यकर्ते आहेत. हे सामान्य कार्यकर्तेच पक्ष पुढे नेतील, असे सांगतानाच आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता नाही, तर नाथाभाऊ गेले याची चिंता आहे, असेही दानवे म्हणाले. भाजपचा एकही आमदार, पदाधिकारी खडसेंसोबत जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला. राजकारणात पक्ष सोडण्याच्या घटना घडत असतात. अनेक नेते अनेक वर्षे पक्षात राहून नंतर पक्ष सोडतात. नाथाभाऊंनी सत्ता भोगली. पदं भोगली आणि 40 वर्षांनंतर पक्ष सोडला. त्यांनी पक्ष सोडू नये,, असे वाटत होते. त्यांच्या मनातली खदखद सर्वांनाच माहीत होती. ते आज ना उद्या निर्णय घेतील, असेही वाटत होते. त्यामुळे त्यांचे अनेकदा मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच पक्षात जाण्याची त्यांच्यावर वेळ आली, असा टोलाही त्यांनी लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.