धक्कादायक… नागपूरात भाड्याच्या घरात सुरु होते नकली क्राईम ब्रॅन्च कार्यालय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात गुन्हेगारीला ऊत आला आहे. नागपूरात आता चक्क नकली क्राईम ब्रॅन्च म्हणजे ‘गुन्हे अन्वेषण शाखा’ सुरु करण्यात आली आहे, तीही भाड्याच्या घरात. इतकेच नव्हे तर डायरेक्टर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा बोर्डही त्याने कारवर लावला होता. ती कार घेऊन तो शहरभर फिरत होता. नरेश पालरपवार नावाचा हा आरोपी क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी चालवत होता.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी पोलिसांनी या नकली क्राईम ब्रॅन्च एजन्सीवर धाड टाकली. यावेळी नरेश पालरपवार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कार्यालयातून काही कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. या फेक एजन्सीच्या माध्यमातून काही अशिक्षित लोकांना आम्ही तुमच्या प्रकरणाचा तपास करून देतो, असे सांगून फसवणूक केल्याची पोलिसांना शंका आहे.