“लहान माझी बाहुली तिची मोठी सावली”, प्रीतम मुंडेंच्या वाढदिवस दिनी पंकजा मुंडेंचे खास ट्विट
बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांचे प्रतिनिधीत्व
मुंबई :भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खास ट्विट केले आहे. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना आशीर्वाद देत नेहमी सुखी राहा, असे म्हटले.
प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत आहेत. प्रीतम मुंडे राजकारणासोबत सामाजिक कामातही अग्रेसर असतात.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक फोटो ट्विट केला आहे. ” लहान माझी बाहुली तिची मोठी सावली… इतकी एकरुप की जणू सावली… वाढदिवसाचे खूप आशीर्वाद प्रीतम तू नेहमी सुखी राहा…, या शब्दांमध्ये पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा लोकसभेत
डॉ. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवून खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत झाली. अखेर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर 1 लाख 78 हजार 920 मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. राजकीय क्षेत्रासोबत प्रीतम मुंडे सामाजिक कामातही अग्रेसर असतात. गोपीनाथ मुंडे यांचे अपघातात निधन झाल्यानंतर प्रीतम मुंडे त्यांच्या जागेवर निवडून आल्या होत्या.
लोकसभेत महाराष्ट्राच्या मुद्यांची प्रभावी मांडणी
महाराष्ट्रातून लोकसभेत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये प्रीतम मुंडे या नेहमी राज्याच्या विकासाचे प्रश्न मांडताना दिसतात. प्रीतम मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत केले. भाषण चांगलेच गाजले होते. प्रीतम मुंडे या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा समर्थपणे सांभाळत आहेत.