मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार

अलिबाग पोलिसांच्या याचिकेवर 9 तारखेला पुढील सुनावणी होणार

0

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना मोठा झटका मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. जवळपास 6 तासांची दीर्घ सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. असे असले तरी याचिकाकर्ते सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले

अर्णव गोस्वामी यांना आज जामीन मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. उच्च न्यायालयात आज सकाळपासून युक्तिवाद सुरु होता. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच जामिनासाठी अलिबाग सेशन कोर्टातही याचिका करता येईल. अशी याचिका केल्यास त्यावर 4 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा, असेही निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशानंतर अर्णव यांना आजची रात्रदेखील क्वारंटाईन जेलमध्ये काढावी लागणार आहे. याबाबत आता पुढील सुनावणी सोमवारी (9 नोव्हेंबर) होणार आहे. आरोपीचे वकील हरीश साळवे यांनी 4 नोव्हेंबरपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्नब गोस्वामी यांना अंतरिम दिलासा देण्याची आग्रही मागणी केली. मात्र, न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एस. एस. कर्निक यांनी अंतरिम दिलासा देण्याबाबत तात्काळ आदेश देण्यास नकार दिला आहे. अर्णव यांच्या वकिलांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणीही केली होती. तसेच कोठडीवर सुनावणी सुरु होण्याअगोदर तिन्ही आरोपींच्या वकिलांनी पोलिसांकडे दाखल केलेली पोलिस कोठडीसाठी रिवीजन कॉपी इंग्रजीमध्ये अनुवाद करुन  न्यायालयाकडे मागितली. त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवादही केला. आरोपींचे तिन्ही वकील हे मराठी आहेत. या अगोदर न्यायालयाचे सर्व कामकाजाचे पेपर मराठीमध्ये झाले आहे. त्यावर आरोपीच्या वकिलांनी मुख्य न्यायदडांधिकारी न्यायालयात युक्तिवाद केला आहे. दरम्यान, इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना 4 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर अलिबाग न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना जेलमध्ये न नेता 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. या नियमानुसार, अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत ठेवले गेले आहे. अलिबागमधील ही शाळा आरोपींसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आली आहे. या शाळेतच त्यांना ठेवले गेले आहे.

अलिबाग पोलिसांच्या याचिकेवर 9 तारखेला सुनावणी

अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी अलिबाग पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायलयात याचिका केली आहे. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.