चार शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित, वीजबिल थकवल्याने महावितरणची कारवाई

0

औरंगाबाद : वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरल्याने महावितरणने औरंगाबाद परिमंडलातील पैठण, गंगापूर, घनसावंगी व मंठा या चार नगरपालिका व नगर पंचायतींच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. 20) खंडित केला. महावितरणच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली असून बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे.

महावितरणने गेल्या काही दिवसांपासून सर्वच वर्गवारीतील ग्राहकांची वीजबिल वसुली करण्याची धडक मोहीम हाती घेतलेली आहे. गत एप्रिलपासून पथदिव्यांचे वीजबिल थकवाणाऱ्या नगरपालिका व नगर पंचायतींचाही त्यात समावेश आहे. एप्रिल-2018 पासून गंगापूर नगरपालिकेने पथदिव्यांचे 14 लाख रुपये व पैठण नगरपालिकेने 21 लाख रुपये वीजबिल थकवले आहे. तर एप्रिलपासून घनसावंगी नगर पंचायतीने 13 लाख रुपये व मंठा नगर पंचायतीने 32 लाख रुपयांचे वीजबिल थकवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महावितरणने अनेकवेळा बिल भरण्याचे आवाहन करूनही या नगरपालिका व पंचायतींनी दाद दिली नाही. अखेर गुरुवारी (दि.20) औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण व  गंगापूर या नगरपालिका तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी व मंठा या नगर पंचायतींच्या वीजपुरवठा खंडित केला. दरम्यान, वीजबिल भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.