ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची भरदिवसा डोक्यात गोळी झाडून हत्या
या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
ठाणे : मनसे पदाधिकारी जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना दुपारी घडली. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गंभीर अवस्थेत शेख यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची सोमवारी (23 नोव्हेंबर) रोजी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना दुपारी घडली. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गंभीर अवस्थेत शेख यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शव विच्छेदनासाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्येचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यात हल्लेखोर जमील यांना डोक्यात गोळी झाडताना स्पष्ट दिसत आहे. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिस दोन संशयिताचा शोध घेत आहेत. जमील यांची हत्या झाल्याचे कळताच, राबोडी परिसरात मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा झाले होते. यात मनसे उपाध्यक्ष जावेद शेख, मनसे नेते अभिजीत पानसे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे देखील घटनास्थळी आले होते. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त या परिसरात लावला होता. जमील शेख यांची हत्या ही स्थानिक नेत्याने किंवा बिल्डरने केली असल्याचा संशय यावेळी मनसेच्या नेत्यांनी बोलून दाखवला. या हल्ल्यामागचे कारण हे क्लस्टर योजना आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध लावावा, मनसेला कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये, असा इशारा मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. तसेच जमील शेख यांच्यावरील हा दुसरा हल्ला होता. पहिल्या हल्ल्यातील संशयित देखील पोलिसांनी अजून पकडले नाहीत. त्यामुळे आता जर पोलिसांनी दिरंगाई केली तर आम्ही आमच्या स्टाईलने काय ते करू, असे मनसे नेते अभिजित पानसे म्हणाले. तर यामागे एकच स्थानिक नेता आहे, तो कोण आहे ते पोलिसांनादेखील माहीत असल्याने लवकरात लवकर त्याला अटक करावी नाहीतर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे जावेद शेख यांनी सांगितले.