ऐन लग्नाच्या दिवशी नववधू बेपत्ता, सासर-माहेरचा राडा, नऊ वऱ्हाडी जखमी
औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली ही घटना
औरंगाबाद : लग्नघर आणि लग्नमंडपात लगीनघाईच्या वेळी असणारी गडबड, गोंधळ सर्वांनाच माहीत असेल. मात्र औरंगाबादमधील एका लग्नात भलतीच गोष्ट पाहायला मिळाली. ऐन लग्नाच्या वेळी नववधू बेपत्ता झाल्याने मोठा गजब झाला. त्यामुळे सासर आणि माहेरच्या कुटुंबात राडा होऊन नऊ वऱ्हाडी जखमी झाले.
औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली. लग्नाच्या आधीच नववधू बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. वधू नेमकी कुठे गेली, ती गायब होण्यामागील कारण काय, याचा पत्ता तिच्या कुटुंबालाही नसल्याचे बोलले जाते. मात्र तिच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये तणाव निर्माण झाला. सुरुवातीला माहेर आणि सासरच्या कुटुंबांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही कुटुंब एकमेकांना भिडल्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. माहेर आणि सासरच्या कुटुंबात उडालेल्या धुमश्चक्रीमध्ये एकूण 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे. औरंगाबादमधील पुंडलिक नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांकडून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.