धुळ्यात मर्सिडीजच्या इंजिनचा स्फोट, नगरसेवक तपन पटेल यांचा मृत्यू

कारच्या इंजिनचा स्फोट झाल्याने जखमी झालेल्या तपन पटेल यांचे उपचारादरम्यान निधन

0

धुळे : प्रख्यात उद्योगपती आणि धुळ्यातील नगरसेवक तपन पटेल यांचा  अपघाती मृत्यू झाला. मर्सिडीज कारच्या इंजिनचा स्फोट झाल्याने जखमी झालेल्या पटेल यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली.

धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे तपन मुकेशभाई पटेल नगरसेवक होते. पटेल बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घरी येत होते. सावळदे (ता.शिरपूर) येथील एनएमआयएसएस कॅम्पसमधून येताना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कारच्या इंजिनचा स्फोट झाला. अपघातात त्यांच्या गाडीचाही चक्काचूर झाला. तपन पटेल कार अपघातात गंभीर जखमी झाले होते. महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु केल्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले. शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून गेले होते. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. तपन पटेल यांच्या निधनाने खान्देशातील सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यसभेचे माजी खासदार दिवंगत मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र, तर माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल आणि उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.