अभय हंचनाळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘मसिआ’ची अर्धवार्षिक सर्व साधारण सभा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ऑनलाईन पद्धतीने आयोजित ही' सभा
औरंगाबाद : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर या लघु उद्योजकांच्या सर्वात मोठ्या संघटनेची अर्धवार्षिक सर्व साधारण सभा अभय हंचनाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार ता. 26 नोव्हेंबर 2020 रोजी पार पडली. कोरोना या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
सचिव राहुल मोगल यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले आणि ते मंजूर केले. सचिव भगवान राऊत यांनी मागील तीन महिन्यांतील कामकाजाच्या माहितीचे सादरीकरण केले. कोषाध्यक्ष बसवराज मोरखंडे आणि विकास पाटील यांनी मागील सहा महिन्यांतील जमा-खर्चाचा आढावा सादर केला. सभेने तो मंजूर केला. मागील तिमाहीमध्ये संघटनेचे सदस्यत्व घेतलेल्या उद्योजकांचे सभेत स्वागत केले. संपादक राजेंद्र चौधरी आणि सहसंपादक राजेश मानधनी यांनी संपादित केलेल्या ‘मसिआ’च्या ‘उद्योग संवाद’ या मसिआच्या 2020-21 या वर्षातील दुसऱ्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अभय हंचनाळ यांनी मसिआच्या वतीने राबवलेल्या मसिआ कनेक्ट कार्यक्रमाची माहिती दिली. डिसेंबर महिन्यात परत एकदा मसिआ कनेक्ट कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मसिआ वाळूज कार्यालयात सुरू असलेल्या मसिआ यूएनडीपी कोवीड-19 हेल्पलाईनच्या माध्यमातून सदस्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वाळूज एमआयडीसीमध्ये होत असलेल्या चोऱ्यांविषयी पोलिस आयुक्त व पोलिस निरीक्षक वाळूज यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार प्रायोगिक तत्वावर खासगी सुरक्षारक्षकांमार्फत रात्रीची गस्त घालण्याची व्यवस्था केली आहे. वाळूज येथील एल, सी आणि एच सेक्टर मधील उद्योजकांनी मिळून खासगी सुरक्षारक्षक नेमले आहेत. या व्यवस्थेमुळे तेथील उद्योगांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसला, अशी माहिती दिली. इतर सेक्टरमधील उद्योजकांनी एकत्र येऊन खासगी सुरक्षारक्षक नेमावे, असे आवाहन अध्यक्षांनी केले. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी उत्तरे दिली. या सर्व साधारण सभेस माजी अध्यक्ष पृथ्वीराज शाह, विजय लेकुरवाळे, सुनील किर्दक, आणि पदाधिकारी किरण जगताप, नारायण पवार, राहुल मोगल, भगवान राऊत, अब्दुल शेख, विकास पाटील, बसवराज मोरखंडे, राजेंद्र मानधनी, गजानन देशमुख, अनिल पाटील, सर्जेराव साळुंके, अर्जुन गायकवाड, भीमराव काडावकर, संदीप जोशी इत्यादी आणि बहुसंख्य सदस्य ऑनलाईन पद्धतीने सभेस उपस्थित होते.