‘मसिआ’ची महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कचरा आणि व्यवस्थापन या विषयावर चर्चा
औरंगाबाद : ‘मसिआ’च्या वाळूज येथील कार्यालयात ‘मसिआ’चे पदाधिकारी एमआयडीसीचे अधिकारी आणि वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कचरा व्यवस्थापन करणारी महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ‘मसिआ’ने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वाळूज औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या मांडल्या. घनकचराविषयी एमआयडीसीने तात्काळ कार्यवाही करण्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीसोबत बैठक घेण्याचे ठरविले. त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत विविध प्रश्न मांडण्यात आले. कचरा उचलण्यासाठी केलेली पद्धती प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना दाखविले. तसेच कंपनी कोणता कचरा उचलेल आणि कोणता नाही, याची माहिती मसिआला देणार आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये कचरा उचलण्याची गाडी जाईल, सध्या तीन गाड्या असून या संख्येत वाढ केली जाईल, असे म्हणाले. तसेच टर्मिनलच्या परिसरातील कचऱ्याची व्यवस्था, त्या जागेचे नूतनीकरण झाल्यानंतर करण्यात येईील. कचरा व्यवस्थापनासाठी यापुढे काळजी घेतली जाईल.या करिता आणखी चांगल्याप्रकारे नियोजन कसे करता येईल, यासाठी कंपनी काम करेल, असे आश्वासन दिले. कचरा गोळा करण्यासाठी सेक्टटरनुसार त्यांच्या नियोजनाची माहिती लवकरच देण्यात येईल. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी उद्योजकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करेल, असे आश्वासन दिले. या बैठकीसाठी मसिआचे उपाध्यक्ष नारायण पवार, सचिव राहुल मोगले, कोषाध्यक्ष विकास पाटील, सुमीत मालानी तसेच कार्यकारिणी सदस्य सर्वश्री अर्जून गायकवाड, अनिल पाटील, गजानन देशमुख, भीमराव कडावकर, शरद चोपडे, सर्जेराव साळुंके यांच्यासोबत एमआयडीसीचे सहायक अभियंता गणेश मुळीकर तसेच उपअभियंता सुधार सुत्रावे व महिंद्रा अँड महिंद्रा प्लाँट मुख्य एस. सुंदर बाबू आणि त्यांचे अधिकारी उपस्थिती होती.