शहीद वैमानिक निनाद मांडवगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
शहीद वैमानिक निनाद मांडवगणे यांचे पार्थिव आज सकाळी 8:30 वाजता कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. नाशिकमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. नाशिकमधील गोदाकाठावर शहीद निनाद यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप दिला जाणार आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हेही अंत्यसंस्काराला उपस्थित आहेत.
शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव आज 9:30 वाजता ओझरला आणण्यात आले होते. येथे त्यांना मानवंदना देण्यात आली. एअरफोर्स स्टेशन येथे पार्थिव रात्रभर ठेवण्यात आले होते.
शहीद निनाद यांची पत्नी आणि मुलगी
निनाद यांचे पार्थिव सकाळी डीजीपीनगर येथील निवासस्थानी ठेवण्यात आले. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवारांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी शहीद निनाद यांची दोन वर्षांची चिमुकलीनेही वडीलांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.