मराठी भाषा दिन : कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत ‘मराठी’साठी आयुष्य वेचणारा नव्वदीतला तरुण!

आज मराठी भाषा दिन. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस राज्यभर साजरा

0

नाशिक : आज (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिन. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस राज्यभर साजरा केला जातो. आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य वेचले. आज महाराष्ट्रात अनेक मराठी घरे आहेत. मात्र, नाशिकमधील ‘मराठी भाषेचं घर’ आम्ही आपल्याला आज दाखवणार आहोत. या घरातील नव्वदीतल्या तरुणाला आपण भेटणार आहोत, ज्याने आपले संपूर्ण आयुष्य या मातृभाषेला समर्पित केले…

ज्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्या कुसुमाग्रजांची नाशिक ही कर्मभूमी. त्याच नाशिकमध्ये आजही मराठी भाषेला समृद्ध करण्याची धडपड सुरू आहे. मराठी भाषेला संपन्न करण्यासाठी, या भाषेला तिचा अभिजात दर्जा देण्यासाठी आणि व्यवहारात मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी अखंड आयुष्य समर्पित करणारे नाव म्हणजे म्हणजे नाशिकचे निष्णात अभ्यासक, यशवंत कुलकर्णी. यशवंत कुलकर्णी म्हणजे मराठी भाषेचं एक चालते बोलते संग्रहालयच. एक विद्यापीठच म्हणावे लागेल.

‘कुठल्याही गावाला गेले की किमान एक पुस्तक विकत घेण्याचा छंद’

सुरकूतल्या बोटांनी पुस्तकाची पाने चाळत आजही ते दिवसातील आठ-दहा तास वाचन करतात. मराठी वाङमयात कदाचितच असे एखादे पुस्तक, एखादे काव्य किंवा एखादा ग्रंथ असेल जो वाय. पी. यांच्या नजरे खालून गेला नाही. 7 हजारांहून अधिक मराठी पुस्तके, ग्रंथ, काव्य संग्रह, आत्मचरित्रे यांचा खच्चून भरलेला ठेवा त्याच्या कपाटातून डोकावतो. विशेष म्हणजे जेवढा पुस्तकांचा संग्रह त्यांच्या घरात आहे, त्याच्या कैकपट त्यांनी तो आपल्या विद्यार्थ्यांना वाटला आहे. वाय. पी यांचा सर्वात आवडता छंद म्हणजे कुठल्याही गावाला कामानिमित्त गेले की किमान 1 पुस्तक तरी विकत घेऊन ते वाचणे.

‘प्रगल्भ वाचनाच्या आवडीचे श्रेय मराठीच्या शिक्षकांना’

सर्वात आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा यातील कोणत्याही पुस्तकातील कोणताही संदर्भ विचारल्यास, ते चटकन पुढचा संदर्भ जोडून सांगतात. एखाद्या तरुणाला अथवा विद्यार्थी दशेत असलेल्या विद्यार्थ्याला लाजवेल असा त्यांचा मराठीचा अभ्यास तुम्हाला अचंबित केल्याशिवाय सोडत नाही. या प्रगल्भ वाचनाच्या आवडीचं श्रेय ते त्यांच्या मराठी शिक्षकांना देतात.

कुसुमाग्रजांच्या नावाने नाशकात संस्था

विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य रवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक होते. त्यांचे मूळनाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. पण त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि एक बहीण.. एकुलत्या एक बहिणीचे नाव कुसुम… कुसुमचे अग्रज म्हणून त्यांनी त्यांचे टोपणनाव कुसुमाग्रज असे धारण केले. मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात कुसुमाग्रजांनी फार मोठे योगदान दिले. कवी असलेले कुसुमाग्रज एक यशस्वी नाटककार झाले. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध हे सर्व प्रकार त्यांनी हाताळले. 10 मार्च 1999 रोजी त्यांचं निधन झाले. कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ नाशिकमध्ये ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे. त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे मोठे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.