मराठा आरक्षण : शशिकांत शिंदे यांचा खासदार उदयनराजेंना बोचरा प्रश्न

सातारच्या गादीचे वारसदार व भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा सुरू

0

मुंबई : मराठा व धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सातारच्या गादीचे वारसदार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. यापूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते. तेव्हा फडणवीस यांनी हे प्रश्न मार्गी का लावले नाहीत, असा सवाल पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याची हमी मी देतो, असे वक्तव्य भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी अलिकडेच केले आहे. त्यास राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी वरील शब्दांत उत्तर दिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजवटीत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आणि धनगर समाजाचे मोर्चे निघाले होते. फडणवीस यांनी तर धनगर समाजाला आरक्षण देण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. मग हे विषय त्यांनी मार्गी का लावले नाहीत. पाच वर्षांच्या सत्ताकाळात फडणवीस यांनी दोन्ही समाजाच्या रास्त मागण्यांना किती न्याय देण्याचा प्रयत्न केला, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला आहे.  भाजपच्या काळात मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेले वकीलच आताही हा खटला सर्वोच्च न्यायालयात लढवत आहेत. पण तरीही याप्रश्नी जाणीवपूर्वक राजकारण करण्यात येते. मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असून भाजप देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही शशिकांत शिंदे यांनी केला आहे.  महाराष्ट्रातील प्रचलित आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी असून, महाविकास आघाडी सरकारचाही तोच प्रयत्न आहे. अशावेळी मराठा आरक्षणात राजकारण न करता एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करण्याचे आवाहन काही संघटनांनी केले होते. त्याचे पुढे काय झाले, असे शिंदे यांचे म्हणणे आहे.

केंद्रानेच हस्तक्षेप करावा  : मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. आरक्षण देण्याच्या मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात नाही. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असेही शिंदे यांनी नमूद केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.