मराठा आरक्षण सुनावणी, चार आठवड्यांसाठी ढकलली पुढे
महाराष्ट्र सरकारची पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याची मागणी
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या खडंपीठासमोर आज ही सुनावणी झाली. दरम्यान सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. यानंतर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ही सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली आहे. याचिकाकर्त्यांनी यादरम्यान घटनापीठाकडे आपले म्हणणे मांडावे, असे न्यायालयाने नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी झाली. राज्यामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यानंतर मराठा बांधवांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. ही नाराजी तसेच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, काही काळासाठी सुनावणी स्थगित करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारची पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याची मागणी आहे. आज ही सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुरू करण्यात आली. त्यातच महाराष्ट्र सरकारचे वकील मुकूल रोहतगी हेही गैरहजर होते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने थोड्यावेळासाठी ही सुनावणी तहकूब केली. याचिकाकर्त्यांकडून पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण देण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे याची सुनावणीसाठी परवानगी देण्यात आली होती. तरीही हे प्रकरण आज तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी आल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.