बनावट कार्डच्या मदतीने एटीएममधून पैसे काढून पळणाऱ्यास रंगेहाथ अटक
विविध बँकेचे बनावट एटीएम कार्ड आणि मोबाईल तसेच रोख रक्कम जप्त
नाशिक : लासलगावमध्ये बनावट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढून पलायन करणाऱ्या एकाला सतर्क नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे दोन साथीदार फरार झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून बनावट कार्डच्या सहाय्याने पैसे काढण्यात आले. ज्या शेतकऱ्याचे पैसे काढले, त्याने तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीला पैशाबाबत विचारणा केल्यानंतर तो पळून जात होता.
लासलगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येवला तालुक्यातील नीळखेडे येथील शेतकरी अरुण कदम हे आले असता, एटीएममधून पैसे येत नाही, आम्ही तुम्हाला मदत करतो, असे सांगून शेतकरी कदम यांच्याकडील पिन नंबर घेत एटीएम कार्ड बदलून बनावट एटीएम कार्डच्या साह्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पैसे येत नाही म्हणून कदम हे तेथून निघून जाण्याच्या तयारीत असताना कदम यांचे बदललेल्या एटीएम कार्डच्या साह्याने पैसे दुसऱ्या साथीदाराने काढल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, संशयित आरोपी सुनील हटकर याला शेतकरी कदम यांनी विचारणा केली असता तेथून तो पळ काढण्याच्या तयारीत होता. कदम यांनी आरडाओरडा केल्याने सतर्क नागरिकांच्या मदतीने सुनील हटकर याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र दोघे सहकारी फरार झाले. पकडण्यात आलेल्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँकेचे बनावट एटीएम कार्ड आणि मोबाईल तसेच रोख रक्कम ५१ हजार रुपये सापडले. पोलिसांनी पैसे आणि बनावट एटीएम आणि मोबाईल जप्त केले आहेत. अटक करणाऱ्याने नाशिक जिल्ह्यातील देवळा, येवला तसेच बीड जिल्ह्यातील लोहा येथे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी दोघे फरार चोरट्यांचा लासलगाव पोलिस शोध घेत आहेत.