पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावर ‘जय श्रीराम’च्या जयघोषामुळे ममता नाराज

त्या म्हणाल्या - एखाद्याला आमंत्रण देऊन अपमान करणे चांगली गोष्ट नाही

0

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राजकीय गदारोळ झाला. येथे व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये मोदींच्या मंचावर ममता बॅनर्जी नाराज झाल्या आहेत. त्या भाषण न करताच परतल्या.
ममता भाषणासाठी मंचावर गेल्या, तेव्हा काही लोकांनी जय श्रीरामचा जयघोष केला. यानंतर ममता माइकवर म्हणाल्या की, “हा एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. एखाद्याला आमंत्रण देऊन अपमान करणे ही चांगली गोष्ट नाही. मी आता काहीच बोलणार नाही. जय भारत, जय बांग्ला.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात दाखल झाले आहेत. येथे त्यांनी राष्ट्रीय ग्रंथालयाचा दौरा केला. यानंतर मोदी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये पोहोचले, येथे ते नेताजींच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीट जारी करतील. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील पंतप्रधानांसोबत येथे उपस्थित आहेत. याआधीही एकाच कार्यक्रमात हजर असूनही दोघांनी एकमेकांशी संवाद साधला नाही.
मोदी सध्या लोकांना संबोधित करत आहेत. ते म्हणाले की, लहानपणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव ऐकले तेव्हा एका नवीन ऊर्जेने भरून गेलो. नेताजींनी देशासाठी आपले जीवन पणाला लावले. आज भारत साथीच्या आजारात इतरांना मदत करत आहे हे पाहून त्यांना आनंद झाला असता.

मोदींच्या भाषणातील विशेष मुद्दे

नेताजींना जन्म देणार्‍या आईला अभिवादन

मोदी म्हणाले की, “नेताजींच्या व्याख्येसाठी शब्द कमी पडतात. इतकी दूरदृष्टी की, तिथपर्यंत बघण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. अगदी कठीण परिस्थितीतही इतके धैर्य, की जगातील सर्वात मोठे आव्हान टिकू शकले नाही. मी त्यांच्या चरणांना आणि त्यांच्या आईला अभिवादन करतो.”

नेताजी म्हणाले होते – मी स्वातंत्र्य मागणार नाही, ते हिसकावून घेईन

पंतप्रधान म्हणाले, “125 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्या वीर मुलाचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी गुलामीच्या अंधारात ती चेतना फुटली होती, ज्याने जगातील सर्वात मोठ्या सामर्थ्यासमोर उभे राहून म्हटले होते की, मी तुम्हाला स्वातंत्र्य मागणार नाही, ते हिसकावून घेईन. आज फक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला नाही तर भारताचा स्वाभिमान जन्मला होता.”

हावडा-कालका मेलला नेताजी एक्स्प्रेस दिले नाव
मोदी म्हणाले की, “मित्रांनो, आज मी बंगालच्या या पवित्र भूमीलाही आदर देतो, ज्यामुळे बालक सुभाषला नेताजी बनवले. ही तीच पुण्यभूमी आहे, जिने देशाला राष्ट्रगान आणि राष्ट्रगीतही दिले. देशाने अभूतपूर्व भव्य कार्यक्रमांसह नेताजींच्या जन्माचे 125 वे वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. हावडा-कालका मेलचे नावही नेताजी एक्स्प्रेस असे ठेवण्यात आले आहे. तसेच दरवर्षी आपण नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करू असेही ठरवले आहे.”

नेताजींनी महिलांना देशासाठी जगण्याची आणि मरणाची संधी दिली

देश जेव्हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहे, देश जेव्हा स्वावलंबी भारताच्या निर्णयाच्या दिशेने वाटचाल करत आहे तेव्हा नेताजींचा संदेश आपल्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे. नेताजींनी विदेशात जाऊन तेथील भारतीय रहिवाशांची चेतना जागवली. त्यांनी देशभरातील प्रत्येक जाती व धर्मातील लोकांना देशाचा सैनिक बनवले. त्यावेळी जेव्हा जग महिलांच्या सामान्य हक्कांविषयी बोलत होते तेव्हा नेताजींनी महिला रेजिमेंट बनवल्या आणि त्यांना आपल्या सैन्यात भरती केले. त्यांना देशासाठी जगण्याची आणि मरणाची संधी दिली.

कोलकात्यात मोदींचे कार्यक्रम

राष्ट्रीय ग्रंथालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा आढावा घेतला. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल (नेताजी भवन) येथे आझाद हिंद फौजच्या सदस्यांचा गौरव केला जाईल. येथेच नेताजींच्या स्मरणार्थ नाणे व टपाल तिकीट जारी करतील.

मोदींच्या आधी ममतांचे शक्तिप्रदर्शन

मोदींच्या आगमनापूर्वी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शक्तिप्रदर्शन केले. विशेष म्हणजे आज मोदींच्या दोन्ही कार्यक्रमात ममता त्यांच्यासोबत व्यासपीठावरही असतील. ममता यांनी कोलकाताला राजधानी बनवण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, “इंग्रज कोलकातातून संपूर्ण देशावर राज्य करत होते. अशा परिस्थितीत, आपल्या देशात एक शहर राजधानी का राहिले पाहिजे. देशात चार फिरत्या राजधान्या असायला हव्यात.”

ममतांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

केंद्र सरकारने 23 जानेवारीला नेताजींचा वाढदिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून करावा घोषित

केंद्र सरकार नेताजींच्या सन्मानाविषयी बोलतात, परंतु त्यांच्या सूचनेवर नियोजन आयोग रद्द करण्यात आला. नेताजींनी आझाद हिंद फौजची स्थापना केली तेव्हा गुजरात, बंगाल आणि तामिळनाडूमधील लोकही होते. ते वाटाघाटीच्या राजकारणाच्या विरोधात होते.बंगालमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यापीठ आणि जय हिंद वाहिनीची स्थापना केली जाईल.आम्ही आझाद हिंद स्मारक बनवू. हे काम कसे केले जाते ते आम्ही दाखवून देऊ. केंद्र सरकारने मूर्ती आणि नवीन संसद इमारतीवर हजारो कोटी रुपये खर्च केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.