‘महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीला देशात होणार लसीकरण उत्सव’
पंतप्रधान मोदींनी टेस्टींग, स्ट्रेसिंग, आणि ट्रिटमेंटवर भर देण्यासह लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे आवाहन
नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी देशातील करोनाची स्थिती आणि लसीकरणाच्या मुद्द्यावर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी करोनासंबंधी चाचण्यांच्या वाढीवर भर देण्याचे आवाहन केले. यासोबतच ११ ते १४ एप्रिल दरम्यान देशात लसीकरण उत्सव साजरा केला जाईल, असे सांगितले.
कोरोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतरही आपल्याला हलगर्जीपणा करून चालणार नाही. मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व काळजी घेणे आवश्यकच आहे. शहरांमध्ये मोठ्या संख्येने गरीब राहतात. झोपडपट्ट्यांमध्ये हे गरीब राहतात. तरुण आणि व्हॉलिंटियर्सनी या नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढे आले पाहिजे. देशातील तरुणांनी ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले.
‘११ ते १४ एप्रिल दरम्यान लस उत्सव’
११ एप्रिलला समाज सुधारक जोतिबा फुले यांची जयंती आहे. तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. याकाळात कोरोनावरील लसीचा एकही डोस हा वाया जाऊ देऊ नका. जास्तीत जास्त लसीकरण झाले पाहिजे. यामुळे देशातील वातावरण बदलण्यास मदत होईल. केंद्र सरकार या ‘लसीकरण उत्सवा’साठी आवश्यक तेवढा लसींचा पुरवठा करेल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आपण देशात एका दिवसात ४० लाख नागरिकांना लसीचा डोस देण्याचा टप्पा ओलांडला आहे. जगातील विकसित देशांनी लसीकरणासाठी जे नियम केले आहेत, भारतातही त्या पेक्षा वेगळे नियम नाहीत. यामुळे आपल्याला प्राधान्य क्रमाने ही लसीकरण मोहीम पूर्ण करायची आहे. यात लसीचे डोस वाया जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.