महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी : पोलिस ‘कोविड योद्धा’ ने सन्मानित आणि गौरव

कोरोनासंकट काळात जिवाची पर्वा न करता नागरिकांचे संरक्षण, पोलिसांचा सन्मान 'कोविड योद्धा'

0

मुंबई :  कोरोना संकटात जिवावर उदार होऊन नागरिकांचे संरक्षण राज्यातील पोलिसांनी केले. ‘महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी’  या कार्यक्रमाच्या माध्यमातून  कोरोनाच्या संकटात जिवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा सन्मान ‘कोविड योद्धा’ म्हणून  करण्यात आला. कर्तव्यदक्ष वर्दीला सॅल्यूट करण्यात आला. विशेष कार्यक्रमात गौरविलेल्या  ‘कोविड योद्ध्यां’ चा हा अल्पसा परिचय.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र राज्याचे महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रमुख उपस्थित हा गौरव करण्यात आला. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी विभागातील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा  ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र राज्याचे महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्वागत मुख्य संपादक आशिष जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी पोलिसांच्यावतीने मुंबईतील पोलिस निरीक्षक रमेश नागरे यांनी राज्यातील जनतेचे खास आभार मानले. यावेळी राज्यातील शांततापूर्ण जिल्हे  म्हणून औरंगाबाद शहर, रत्नागिरी जिल्हा, नवी मुंबई शहर यांचा गौरव करण्यात आला. रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक मोहित कुमार आणि नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी हा गौरव स्वीकारला.

मंजुनाथ सिंगे, पोलिस उपायुक्त परिमंडळ ८, मुंबई : फक्त पोलिसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपल्या पुढाकाराने कालिनामध्ये कोविड सेंटर उभे राहिले. कलिनामधील नव्याने तयार झालेल्या पोलिस क्वॉर्टर्समध्ये हे कोविड सेंटर तयार झाले. पण या इमारतीमध्ये पाणी, वीज अशा कोणत्याही सुविधा नव्हत्या. आपल्या प्रयत्नांमुळे इमारतीला ओसीसह या सगळ्या सुविधा अवघ्या १० दिवसांत मिळू शकल्या. या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्थाही आपल्याच पुढाकाराने झाली.   आतापर्यंत या कोविड सेंटरमध्ये २ हजारांच्या वर पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचार झाले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना आम्हाला अभिमान वाटतो.

संदीप मिटके, उप विभागीय पोलिस अधिकारी, अहमदनगर : नगर शहरातील दिव्यांग, विधवा, अंध व्यक्ती, कामगार आणि गरजू व्यक्तींपर्यंत आपण लॉकडाऊनच्या काळात किराणा माल पोहोचवलात. तब्बल ७ लाख ३६ हजार २१२ अन्न धान्याच्या पाकिटांचे आपण  वाटप केले. एवढेच नव्हे तर मुक्या प्राण्यांना चारा पुरवण्याची जबाबदारीही निभावली. परप्रांतीय प्रवाशांना २१२ बसेस सोडून त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था केली. आपल्या पुढाकाराने दरबार चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएमही बसविण्यात आले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना अभिमान वाटतो.

निवृत्ती बापूराव कोल्हटकर, पोलीस निरीक्षक, नवी मुंबई : नवी मुंबईतील पोलिस कर्मचाऱ्यांच्या विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित १५६ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आपण योग्य  ती काळजी घेतली. पोलिस कर्मचारी, मंत्रालयातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, अशा ४७०० जणांची तीन दिवसांत रॅपिड अँटिजेन टेस्ट करुन घेतली. कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, संवाद साधून त्यांचं मनोबल वाढवले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना तुमचा अभिमान वाटतो.

अनिल डफळ, पोलिस उपनिरीक्षक, सायबर क्राईम : चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, या अफवा समाजमाध्यमांमध्ये पसरवल्या जात असताना त्या पोस्टच्या मुळापर्यंत आपण गेलात. ही अफवा पसरवणाऱ्याला थेट आंध्र प्रदेशात जाऊन अटक केली. तसेच कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला सन्मानाने गौरव करताना  अभिमान वाटतो.

ए. पी. क्षीरसागर, पोलिस शिपाई, सांगली : कोरोना काळात रस्त्यावर पडलेल्या अपंग व्यक्तीला आपण आधार दिला. स्वखर्चाने त्याला नवे कपडे देऊन अपंग व्यक्तीला मिरजमधील सेवाभावी संस्थेत पोहोचवले. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर समाजमाध्यमांवर येताच, प्रकरणाचा तातडीने छडा लावलात आणि १३ जणांना अटक केली. आपल्या सतर्कतेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.  ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपल्याला गौरवताना अभिमान आहे.

अश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पुणे : फोन पे या कंपनीतून बोलत असल्याचा बनावट फोन आल्यानंतर एका ग्राहकाची तब्बल दीड लाखांची फसवणूक झाली. पण आपल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आपण वेळीच बँकेशी पत्रव्यवहार करुन ग्राहकाचे दीड लाख परत मिळवून दिलेत. महाराष्ट्राची शान म्हणून आपला गौरव करताना अभिमान आहे.

तेजस्विनी सातपुते, पोलिस अधीक्षक, सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काचं हॉस्पिटल मिळावं म्हणून चैतन्य पोलीस ऑक्सिजन हॉस्पिटल निर्मितीसाठी  आपण पुढाकार घेतलात. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना व्हिटॅमिनच्या गोळ्या, मास्क मिळवून दिलेत. कोरोना काळात जनतेच्या मनातून भीती दूर करण्यासाठी आपण प्रभावी जनजागृती केली. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करतानाअभिमान वाटतोय.

प्रीती शिंत्रे, पोलिस निरीक्षक, पुणे : कोरोनाग्रस्तांच्या प्लाझमा उपचार पद्धतीत आपण मोलाची भूमिका बजावली. वेबसाईटच्या  माध्यमातून आपण ६३५ प्लाझमा दाते आणि ५७९ कोरोना रुग्णांचा संपर्क घडवून आणला. आपल्या प्रयत्नांमुळे ३२५ गरजू रुग्णांना वेळेत प्लाझमा उपलब्ध झाला. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरवताना ‘अभिमान मान उंचावते.

रुपाली बोबडे, पोलिस उपनिरीक्षक, सायबर क्राईम मुंबई :  कोरोना काळात वाढलेले गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी आपण महत्त्वाची भूमिका बजावलीत. खोटी आमिषे दाखवून लुबाडणाऱ्या आणि समाज माध्यमांमधून खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. ६४५ प्रकरणांची दखल घेऊन गुन्हे नोंदवलेत. महिला आणि बालकांविरोधातल्या गुन्ह्यांचाही तात्काळ छडा लावत ४८ आरोपींना अटक झाली. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरवताना  अभिमान आहे.

 आरती सिंह, पोलिस आयुक्त, अमरावती : काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना नियंत्रणात आणण्यात आपण अत्यंत मोलाची भूमिका बजावली. लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी, मालेगावात जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर मेसेजेसना आळा घालणं, कोरोना प्रतिबंध आणि धार्मिक सौहार्द कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी धर्मगुरूंशी बातचीत, अशी महत्त्वाची कामगिरी आपण खुबीने पार पाडली. तसेच कोरोना आटोक्यात येताच कापड गिरण्या सुरू करण्यासाठीही आपण पुढाकार घेतला. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना अभिमान वाटतो

प्रदीप शिवाजीराव काकडे, पोलिस निरीक्षक, नांदेड : कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्या मृतदेहांवर आपण अंत्यसंस्कार केले. संपूर्ण कुटुंबालाच कोरोना झालेला असताना अंत्यसंस्कारावेळी कोणालाही हजर राहणे शक्य नसते. अशा कुटुंबीयांच्या मदतीसाठी आपण पुढे आलात आणि आदरपूर्वक मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना अभिमान वाटतो.

चंद्रकांत बाळशिराम लांडगे, पोलिस निरीक्षक, मुंबई : जुलै महिन्यात प्रचंड पावसामुळे मुंबईतील घाटकोपरमध्ये जमीन खचली. त्यावेळी आपण स्वतःचा जीव धोक्यात घालून एका वृद्ध महिलेची सुटका केली. तिला सुरक्षित स्थळी हलवले. अशा प्रकारे जोखीम उचलत २४ रहिवाशांची सुखरुप सुटका केली. महाराष्ट्राची शान म्हणून आपला गौरव करताना आम्हाला अभिमान वाटतो.

संतोष संपत तोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलाला कोरोनाचा सामना करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरवण्याची महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर होती. पोलिसांना मास्क, फेसशिल्ड, व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर्स  पुरवण्यात आपला महत्त्वाचा वाटा होता. विशेष म्हणजे सुट्टीही न घेता आपण आपली जबाबदारी चोख पार पाडली. आपल्याला जुलै महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनाला हरवून आपण लगेचच पुन्हा कर्तव्यात रुजू झाला. पोलिस महासंचालक कार्यालय, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचं निवासस्थान निर्जंतुक करुन घेण्यामध्येही आपला मोठा वाटा होता. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपल्याला गौरवताना आम्हाला अभिमान आहे.

दर्शन सूर्यकांत सोनवणे, पोलिस शिपाई, नाशिक : कोरोना काळात नाशिकमधले पोलिस कर्मचारी, शासकीय कर्मचाऱी यांना आरोग्यविषयक साहित्य वाटपाची जबाबदारी आपल्यावर होती. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या गोगीवॉच या घड्याळाचं वाटप आपण केलंत. तसंच यासंदर्भातलं प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना दिले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना आम्हाला अभिमान आहे.

कुंडलिक कायगुडे, पोलिस निरीक्षक, मुंबई : कोरोनाकाळात वाहतूक अंमलदारांना १२ तास ड्युटी आणि ३६ तास ऑफ देऊन त्यांच्यावरचा ताण हलका करण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावली. वाहतूक पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली. कोरोनाबाधितांना आपण ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवून दिली. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना आम्हाला अभिमान आहे.

हेमंत बावधनकर, पोलिस निरीक्षक, मुंबई : मुंबईतून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावाला पाठवण्यासाठी २ लाख ६ हजार ३४३ ट्रेन्स रवाना झाल्या. मजुरांच्या गर्दीचे नियोजन, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत शिस्तबद्ध आखणी करत आपण महत्त्वाची भूमिका पार पाडली. एकही अनुचित प्रकार किंवा एकही गुन्हा घडला नाही. या कामात मदत करणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना होणार नाही, याचीही खबरदारी आपण घेतली. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना आम्हाला अभिमान वाटतो.

डॉ. बाळसिंग राजपूत, पोलिस अधीक्षक, सायबर क्राईम, मुंबई : कोरोना काळात अफवा पसरवणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात आपण धडक मोहीम उघडली. ६४५ प्रकरणांत आपण गुन्हे दाखल केलेत, तर ३०३ आरोपींना अटकही केली. समाज माध्यांवर करडी नजर ठेवत आक्षेपार्ह पोस्ट आणि अफवा लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, याची खबरदारी घेतली. क्राईम कॅम्पेन ही जनजागृतीची मोहीम यशस्वीपणे राबवली. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरवताना आम्हाला अभिमान आहे.

रमेश बाबुराव नागरे,  पोलिस निरीक्षक, मुंबई : कोरोनाचा एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये आपण तैनात होतात. लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी, नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप, अन्नधान्य वाटप यामध्ये आपण मोलाची भूमिका बजावलीत. धारावीच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये फिरून आपण कोरोनाबाबतीत जनजागृती केली. धारावीतील कोरोना संक्रमण आटोक्यात येण्यात आपला मोलाचा वाटा आहे. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना ‘आम्हाला अभिमान आहे.

प्रसाद मनोहर औटी, पोलिस नाईक, सोलापूर ग्रामीण : आषाढी वारीची परंपरा कोरोनामुळे यंदा खंडित झाली. वारकरी वेश परिधान करुन आपण वारकऱ्यांना पंढरपुरात न येण्याचे आवाहन केले. यंदाची वारी घरच्या घरी साजरी करण्यासाठी वारकऱ्यांना प्रोत्साहन दिले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना  अभिमान वाटतो.

राजेंद्र चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी, नागपूर  : नागपूरमधील बुटीबोरी, एमआयडीसी भागात आपण पुढाकार घेऊन वेळोवेळी रोडमार्च काढला. कोरोनासंदर्भात नागरिकांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली. जवळपास पाचशे स्थलांतरित मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून विशेष खबरदारी घेतली. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना आम्लाहा अभिमान वाटतो.

सुधाकर देढे, पोलिस निरीक्षक, गडचिरोली : कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे रोजगार गेले. असे अनेक कामगार, भिकारी, वंचितांची उपासमार होत होती. त्यांच्या मदतीला आपण धावून गेलात. अशा शेकडो लोकांची आपण जेवणाची व्यवस्था करुन दिली. तसेच अशा कुटुंबीयांना तांदळाचे वाटपही केले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना अभिमान आहे.

त्रिशिला गावंड, पोलिस नाईक : कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, दोन वेळचे खायचेही मिळेना… अशा लोकांना आपण आधार दिला. त्यांच्या मदतीसाठी पुढे आलात.  अशा गरजू लोकांना जेवण मिळेल, याची खबरदारी आपण घेतली. तसेच त्यांना अन्नधान्य वाटपही केले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना आम्हाला अभिमान वाटतो.

प्रशांत घागी, पोलिस नाईक, गडचिरोली : कोरोना काळात कर्तव्य बजावण्यासाठी एसआरपीएफच्या विविध कंपन्या गडचिरोलीमध्ये तैनात होत्या. त्या ९५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आपण केली. तसेच त्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारीही घेतली. अधीक्षक कार्यालय आणि परिसर सॅनिटाईज करण्याचे कर्तव्यही आपण चोख बजावले. ‘कोविडयोद्धा’ म्हणून आपला गौरव करताना अभिमान आहे.

शरद आसाराम झिने, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम : परदेशातून आंतरराष्ट्रीय VOIP कॉल्स हे अनधिकृतपणे भारतातील सिमबॉक्सवरुन केले जात होते. देशविरोधी कायवाया करण्याचा या गुन्हेगारांचा हेतू होता. याची माहिती मिळताच, आपल्या पथकाने तातडीनं याचा छडा लावला. या कारवाईसाठी आपण बेस्ट डिटेक्शन ऑफ मंथ बक्षीसही मिळवले. महाराष्ट्राची शान म्हणून आपला गौरव करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.