शेतकऱ्यांच्या संघर्षाला महाराष्ट्रातून ताकद देणार; पवारांनी उघड केली रणनीती

राज्यातील सर्व समविचारी पक्ष आणि नेत्यांना करणार एकत्रित

0

कोल्हापूर : दिल्लीत केंद्रीय कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे, त्याला ताकद देण्यासाठी राज्यातील सर्व समविचारी पक्ष आणि नेत्यांना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन आंदोलनास पाठिंबा देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत दिली.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पवार कोल्हापुरात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रमुख मागण्या मान्य होत नसल्याने दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. याबाबत केंद्राने समिती नेमली असली तरी ज्यांचा केंद्राच्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे नेते या समितीत आहेत. त्यामुळे विधेयकाला पाठिंबा असलेल्या नेत्यांबरोबर कसली चर्चा करायची म्हणत शेतकऱ्यांनी चर्चा टाळली आहे. आता शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी देशातील लोकांना एकत्रित करण्याची मोहीम सुरू आहे. राज्यातही याबाबत सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. ज्यांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा आहे, त्या सर्व घटकांना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसोबत असल्याचे जाहीर करण्यात येईल, असेही पवारांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण मिळावे ही राज्य सरकारची भूमिका आहे, त्याच दिशेने सरकारची पावले पडत असल्याचे सांगून पवार म्हणाले, खोटे आरोप करून राज्य सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र चालले आहेत. मात्र, हे सरकार भक्कम आहे. ते पाच वर्षे नक्की टिकेल. खोट्या आरोपांचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. ‘काही लोकांना केवळ मिरवण्यासाठी सुरक्षा लागते’

राज्य सरकारने काही नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर केंद्राने त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मुळात सुरक्षा देण्याची गरज आहे का, संभाव्य धोका किती आहे याचा अभ्यास करायला हवा. तो अभ्यास करूनच कदाचित राज्य सरकारने काही नेत्यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात केली असेल. पण राज्य सरकारच्या या निर्णयानंतर केंद्राने काही नेत्यांना सुरक्षा पुरवणे म्हणजे राज्याच्या अधिकारात हस्तक्षेप करणे हे आश्चर्यकारक आहे. काही नेत्यांना केवळ मिरवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा लागते असा टोला मारतानाच सुरक्षा वाढविल्याने काही नेत्यांना आता चांगली झोप लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

साखर कारखान्यांसाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार

साखरेचा दर वाढविण्याचा केंद्रासमोर प्रस्ताव आहे. पण, त्याची अंमलबजावणी न झाल्याने साखर कारखान्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे, या पार्श्वभूमीवर दरवाढीची अंमलजावणी तातडीने करावे, यासाठी लवकरच साखर महासंघाच्या नेतृत्वाखाली लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही पवारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.