महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी…
रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे यांची मागणी
नांदेड : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) कडून राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षा केंद्र निवड करण्यासाठी मुभा देण्यावरून आयोग गोंधळलेला दिसतो आहे, कोरोना महामारीच्या काळात आयोग परीक्षा कशी घेणार, या चिंतेत विद्यार्थी आहे. त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा घेण्यात याव्यात. २० सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०२० या काळात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा ही ५ एप्रिल रोजी होणार होती; पण कोरोना या जागतिक महामारीमुळे परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेणे नियोजित आहे. या परीक्षा घेण्यावर पांडुरंग शिंदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, कोरोना संबंधित नेमकी कोणती व कशाप्रकारे आयोग दक्षता घेणार आहे? याची माहिती पालकवर्गासाठी आयोगाने जाहीर करावी. परीक्षा केंद्राबाबत आयोग अजून गोंधळ वाढवत आहे. तालुका ठिकाणापासून जिल्ह्याच्या ठिकाणी जाणेदेखील अशक्य आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत होण्याची शाश्वती नाही. अशा काळात विद्यार्थी परीक्षा केंद्रावर कसे पोहोचतील व तिथे आल्यानंतर त्यांना पिण्याचे पाणी व नाष्ट्याची व्यवस्था होणार आहे का?. परीक्षा दिवसभर असणार आहे, कोरोना प्रादुर्भाव निकष पाळले जातील, असे नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याचीच जास्त शक्यता यासंबंधी आयोगाने काय उपाययोजना केल्या आहेत. विद्यापीठीय परीक्षा परीक्षार्थींची काळजी सरकार करते तर येथे वेगळी भूमिका का? राज्यात अडीच ते तीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत हे सर्व विद्यार्थी एकाच दिवशी बाहेर आले तर लॉकडाऊनचा फज्जा उडेल. कोरोना एका जरी विद्यार्थ्यांला झाला तर परिस्थिती हाता बाहेर जाईल. अशा मेडिकल आणीबाणी काळात परीक्षा न घेता सर्व परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा घ्याव्यात. राज्यातील अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांत परीक्षेची तयारी करत असतात. ते सर्व लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी आले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्र निवडण्याचे स्वातंत्र्य देऊन परीक्षा या सर्व परिस्थिती सामान्य झाल्यानंतर घेतल्या तर विद्यार्थी चांगल्या मानसिकतेत या परीक्षा देतील.