‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत महाराष्ट्र अव्वल, पुणे आणि अहमदनगरने पटकावला पहिला क्रमांक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्र शासनाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

0

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्र शासनाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना वेगवेगळया श्रेणींमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 24 फेब्रुवारी 2021 रोजी 2 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे राज्य आणि निवडक जिल्ह्यांना येथील पुसा कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री, कृषी विभागाचे सचिव आणि कृषी आयुक्त यांच्यासह, पुणे आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला हजर राहतील.

लाभार्थ्यांची तपासणी आणि तक्रार निवारणात महाराष्ट्र अग्रेसर

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी 5 टक्के लाभार्थींची तपासणी करण्यासाठी यादी आली होती. केंद्र शासनाकडून आलेल्या या यादीत महाराष्ट्र राज्यात 4,68,747 शेतकऱ्यांची जिल्हा, तालुका व गावनिहाय नावे होती. महाराष्ट्राने या यादीतील 99.54 टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण केली. यासह राज्याने देशात उत्कृष्ट काम करत पहिला क्रमांक पटकाविला. राज्यात या योजनेसंदर्भात जवळपास 38 हजार 991 तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी 23 हजार 632 तक्रारींचा अर्थात 60 टक्के पेक्षाही जास्त तक्रारी महाराष्ट्राने सोडवल्या. म्हणून महाराष्ट्राला देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांचाही होणार सन्मान

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याने 2278 तक्रारींपैकी 2062 तक्रारी सोडवल्या. अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत सर्वच्या सर्व 28802 लाभार्थींची म्हणजे 100 टक्के तपासणी पूर्ण केली. यासह देशात उल्लेखनीय काम केले म्हणून पुणे व अहमदनगर जिल्ह्याला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 1.14 कोटी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली आहे. आतापर्यंत साधारण 1.05 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 11633 कोटी रुपये जमा झाले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.