राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन?; राजेश टोपेंनी केले खूप मोठे विधान
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे संकट घोंगावतांना ...
जालना : राज्यावर कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतानाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जालना येथे पत्रकारांशी बोलताना लॉकडाऊन बाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले.
त्यात त्यांनी पुन्हा एकदा निर्बंध लावण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केले. या संबोधनात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची सद्यस्थिती सांगितली व नागरिकांना सतर्क केले. कोरोनाची साथ अजून गेलेली नाही. धोका अद्याप टळलेला नाही. आपण एका नाजूक वळणावर आहोत. तिथून कोणत्या दिशेने जायचे आहे हे तुम्हाला ठरवायचे आहे. पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे नसेल तर आपल्याला नियम आणि शिस्त पाळावीच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले होते. आपल्याला पुन्हा लॉकडाऊन नको आहे, असे स्पष्ट करत बेशिस्त वागणाऱ्यांना व विनामास्क फिरणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फैलावर घेतले होते. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका, स्वयंशिस्त पाळा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर आज जालना येथे बोलताना राजेश टोपे यांनी या अनुषंगाने खूप मोठे विधान केले. सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे नमूद करत राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून बिनधास्तपणे वावरण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसत आहे. ही स्थिती कोरोना वाढीस कारणीभूत ठरणारी असून त्यासाठीच निर्बंध लावले जाणार आहेत. लॉकडाऊन लावला जाणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येणार आहेत. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन त्यावर निर्णय होईल व त्याची घोषणा केली जाईल. याबाबत मुख्यमंत्रीही अनुकूल आहे, असे टोपे यांनी सांगितले.