‘लेखणी बंद’चा विद्यार्थ्यांना फटका, विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
अनेक विद्यापीठांनी अंतिम वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय
मुंबई : सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजना इत्यादी मागण्यांसाठी तीन दिवसांपासून ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू आहे. राज्यातील 14 विद्यापीठातील अधिकारी कर्मचार्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसला आहे. राज्यातील अनेक विद्यापीठांनी अंतिम वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
राज्यातील 14 विद्यापीठांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल 17 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील बहुतांश विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा संकटात सापडल्या आहेत. यामुळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठांनी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच इतर काही विद्यापीठांकडूनही या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही विद्यापीठांमध्ये एटीकेटीच्या परीक्षाही पुढे ढकलणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या सोमवारी (28 सप्टेंबर) उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत सामंत यांनी विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगापासून आश्वासित प्रगती योजना संदर्भात निर्णय घेतला जाईल. येत्या एका महिन्यातच अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हे लेखणी बंद आंदोलन तात्काळ मागे घ्यावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले होते. मात्र त्या बैठकीनंतरही या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी हे लेखणी बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यामुळे आता सरकारने यासाठीचे परिपत्रकच काढावे, अशी मागणी राज्यातील विद्यापीठ अधिकारी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. यानुसार आज मुंबईतील कलिना आणि फोर्ट संकुलात लेखणीबंद आंदोलनाच्या माध्यमातून दिवसभर निदर्शने केली जाणार आहेत. त्यासोबतच राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ शिक्षक अधिकारी व कर्मचारी समन्वय समितीचे प्रमुख दीपक घोणे यांनी दिली.