खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत यंदा शुकशुकाट; ‘मर्दानी दसरा’ रद्द!
कोरोनाच्या सावटात यंदा सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे
जेजुरी : कोरोनामुळे राज्यातील अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबाच्या जेजुरी गडावरती होणारा ‘मर्दानी दसरा’ यंदा रद्द होणार आहे. अशी माहिती देवस्थानच्या अध्यक्ष आणि विश्वस्तांनी दिली. मात्र मोजक्या पदाधिकाऱ्यांमार्फत साध्या पद्धतीने बाकीचे धार्मिक विधी करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिलेली आहे.
खंडोबाच्या जेजुरीतील दसरा हा ‘मर्दानी दसरा’ म्हणून ओळखला जातो. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर मर्दानी खेळांची स्पर्धा रंगते. 12 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात. तब्बल 42 किलोंंची असणारी ही तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची तसेच वेगवेगळ्या कसरती करून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा गडावर रंगते. 42 किलो वजन असणारी ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आल्यावर मर्दानी सोहळा होत आहे. मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात. मात्र सध्या महाराष्ट्रासह देशावरती कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद आहेत. या मंदिरांतील धार्मिक सोहळे बंद आहेत. त्यामुळे तीन दिवसांनी असणारा जेजुरी गडावरील मर्दानी दसरा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मात्र मोजक्या पदाधिकाऱ्यांमार्फत साध्या पद्धतीने बाकीचे धार्मिक विधी करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिलेली आहे. कोरोनाच्या सावटात यंदा सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीतही दसऱ्याचा उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. यंदा भक्तांचा ना जल्लोष, भंडाऱ्याची उधळण ना येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष होणार. तर ना सळसळत्या उत्साहासह मर्दानी दसऱ्याच्या स्पर्धा रंगणार. कोरोना संकटामुळे यंदा सोन्याची जेजुरी दसऱ्याच्या दिवशीही शांतच असणार.