औरंगाबाद : यापूर्वी अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झालेला अशोक साहेबराव वैद्य (रा. हर्सूल) हा जामिनावर बाहेर आल्यानंतरही राज्यभरात अनेक तरुण, तरुणींना फसवत होता. सरकारी नोकरी मिळेल, या आशेने अनेकांच्या आई-वडिलांनी आयुष्यभर कमावलेली जमापुंजी या भामट्याला दिली. काहींनी तर बँकेतून चक्क दहा ते बारा टक्के व्याजाने कर्ज घेऊन त्याला पैसे दिले. मात्र, भावनाशून्य झालेल्या अशोकने अनेक तरुण-तरुणींचे लाखो रुपये लंपास केले.
उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असणारे, खासगी नोकरी असलेले, परंतु सरकारी नोकरीचे अप्रूप असलेल्यांना अशोक मोठ्या चलाखीने हेरत होता. केवळ औरंगाबादेतच नव्हे, तर राज्यभरात त्याने हे त्याचे फसवणुकीचे जाळे पसरवून लाखो रुपयांची मोहमाया कमावल्याचे समोर येत आहे. असाच पदव्युत्तर शिक्षण घेतलेला योगेश नामदेव गोरे (३३, रा. चिकलठाणा) याची फेब्रुवारी २०१९ मध्ये अशोकसोबत भेट झाली होती. स्वत:ला स्काऊट गाइडचा महाराष्ट्राचा मुख्य आयुक्त असल्याचे सांगून योगेशला रेल्वे विभागात ११ लाख रुपयांमध्ये टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. योगेशने स्वत:सोबत त्याचा मित्र अक्षयलाही सहभागी करून घेत त्याला प्रत्येकी पाच लाख रुपये दिले. मात्र, नंतर त्याच्याकडून टाळाटाळ सुरू झाल्यावर योगेशने पुढे येत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यामुळे त्याचे मोठे रॅकेट समोर आले. तक्रार केल्याचे कळाल्यापासून दीड महिन्यापासून फरार झालेल्या अशोकला अखेर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. भावनाशून्य झालेल्या अशोकने अनेक तरुण-तरुणींचे लाखो रुपये लंपास केले. विशेष म्हणजे कार्यालयात नोकरीला असलेल्याना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्याने गंडा घातल्याचेही आता तपासात उघडकीस येत आहे. निरीक्षक दादाराव शिनगारे, उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी, विठ्ठल मानकापे, महेश उगले यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
तक्रारी स्वीकारणे सुरू : अशोककडून फसवणूक झालेल्यांची आर्थिक गुन्हे शाखेत आता तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यात बुधवारी दीपक शहाणे (३२, रा. हर्सूल) हेही आले होते. त्यांनी मेहुण्याला नोकरी लावण्यासाठी चक्क खासगी बँकेतून बारा टक्के व्याजाने कर्ज घेऊन अशोकला सात लाख व इतर रक्कम दिली होती.
चाळीसगाव, नांदेड, मुखेड, मालेगावच्यादेखील तक्रारी
औरंगाबादसह जळगाव, नांदेड, बीड, जालना, परभणीतील जवळपास ३० पेक्षा अधिक तरुणांना याने गंडा घातल्याचे उघडकीीस आले आहे .चौकशीदरम्यान चाळीसगाव, नांदेड, मुखेड, मालेगावच्या तरुणांनाही त्याने फसवले. परंतु त्यांना पुढे येण्यासाठी पोलिसांनाच त्यांना विनंती करावी लागत आहे. तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस करत आहेत. विशेष म्हणजे त्याच्या एपीआय कॉर्नर येथील कार्यालयात नोकरी दिलेल्या तरुणांकडूनदेखील त्याने लाखो रुपये उकळले.
आई, पत्नी घराला कुलूप लावून गावाला
आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक अशाेकच्या घराची तपासणीसाठी गेले होते. मात्र, त्याची आई, पत्नी घराला कुलूप लावून गावाला निघून गेल्याचे समोर आले. त्याच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पथकाने पत्रव्यवहार केला आहे. बहुतांश तरुणांकडून अशोक रोख स्वरूपात पैसे घेत होता.