नांदेडमध्ये ज्वेलर्स दुकानात दरोडा, २४ तासात पोलिसांनी लावला छडा
नांदेड : शहरातील वजिराबाद येथील गोविंदराज ज्वेलर्स या दुकानातून सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी घडली होती. या चोरीचा तपास पोलिसांनी अवघ्या २४ तासात लावला असून, या घटनेतील आरोपी महिलेसह सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
शहरातील वजिराबाद येथील गोविंदराज ज्वेलर्स असून, या ज्वेलर्समध्ये २६ डिसेंबर रोजी चोरी झाली होती. यात २३ लाख ८५ हजार १४७ रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी निलेश तापडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने करुन दुकानामध्ये नोकरीस असलेली एक महिला सोन्याच्या दागिण्याचा बॉक्स चोरी करीत असल्याचे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर पोलिसांनी या दुकानात काम करणाऱ्या चिखलवाडी येथील वंदना विठ्ठल तांदळे या महिलेला भोकर तालुक्यातून ताब्यात घेतले. या महिलेची विचारपूस केली असता वंदना तांदळे यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच वंदना तांदळे या महिलेने चोरी केल्याचे कबूल केली.
पोलिसांनी तिच्याकडून सोन्याचे २३ लाख ८५ हजार रुपयांचे मोठे नेकलेस जप्त केले आहेत. सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप शिवले व यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले.