मराठा आरक्षणावरून ट्वीट करणाऱ्या चंद्रकांतदादांना जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी केला व्यक्त

0

रत्नागिरी : घरात बसून चंद्रकांत पाटील  यांनी ट्वीट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे, असे वाटत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी, आम्ही प्रयत्न करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई का झाली, याचा अभ्यास भाजपने केलेला दिसत नाही, असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला. सावर्डे येथे ते बोलत होते. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी आमची शिफारस यादी राज्यपालांकडे  दिली आहे. यावर पुढील 15 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना सरकारने केल्याची माहिती जयंत पाटील दिली आहे. राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणे स्वाभाविक आहे, पण त्यांची नाराजी आम्ही दूर करू, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

रक्षा खडसेंचे कौतुक...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार रक्षा खडसे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेचं समर्थन केले जात आहे. रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षाच्या खासदार असल्या तरी जिल्ह्यातील केळी उत्पादकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्या भूमिका मांडत आहेत. त्यात वावगे काय?, असा सवाल जयंत पाटील यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा  खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हा प्रकार राज्य सरकारला निश्चितच महागात पडणार, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर शरसंधान साधले. चंद्रकांत पाटील यांनी यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ट्वीट करत सरकारवर घणाघाती टीका केली. राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. या शिवाय मराठा आरक्षण ईडब्ल्यूएस अंतर्गत देण्याचे आश्वासनही दिले होतं. मात्र, त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी  एसईबीसी प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले. अकरावी, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. मराठा तरुणांचं भवितव्य अंधारमय होत चालले आहे. मात्र, बिनकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही, हे सिद्ध होतं आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. राज्य सरकारने आतातरी सत्तेचा माज सोडून मराठा तरुणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिले आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.