‘आश्रम मधील जपनाम वाला भुपा आणि साहेबांवर टिका करणारा (भा)जपनामवाला गोपा सारखेच’
पवारांना डिवचणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचे उत्तर
सांगली : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष, असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली.
‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मला पवार साहेबांबाबत असे बोलायचे नव्हतं,” अशा शब्दांत पाटील यांनी सारवासारव केली आहे.
टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल करत करत चंद्रकात पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
पाटील यांनी एकाबाजूला सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असताना आता या वादात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे, असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता असे देखील गोपीचंद पडळकरांनी विचारले आहे. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ज्यांच्या डोक्याच्या गोळ्या संपल्यात अशा वाचाळवीरांनी औकात पाहुन साहेबांवर बोलावे. राहिला मोदींचा प्रश्न तर त्यांना विचारा तुमचा गुरु व मार्गदर्शक कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. मिटकरी म्हणाले, इकडे 4 खासदार 303 ला भारी. जसे 56/55/44 (105)ला भारी. बारामतीत डिपॉझिट का जप्त झाले यावर भाष्य केले असते तर समजु शकलो असतो. प्रसिद्धी पिसाटांना थोडे चर्चेत राहायला अधूनमधून मानसिक झटके येतात. आश्रम मधील जपनाम वाला भुपा आणि साहेबांवर टिका करणारा (भा ) जपनामवाला गोपा सारखेच असे त्यांनी म्हटले.